Gold Import Duty | सोन्याहून पिवळं! सीमा शुल्क आता फक्त 4 टक्के, सोन्याचे दर घसरणार
सोन्याला लागलेलं तस्करीचं ग्रहण हटण्याची दाट शक्यता आहे. तर स्थानिक बाजारातील पन्नाशीच्या आसपास असलेले सोन्याचे भाव उतरण्याचीही शक्यता आहे. कारण वाणिज्य मंत्रालयाने सोन्यावरील सीमा शुल्क फक्त 4 टक्के ठेवण्याची घोषणा केली आहे. परिणामी मार्केटमध्ये सोन्याला पुन्हा झळाळी मिळणार आहे.
मुंबई : आज सोनेरी दिवस आहे. सोन्याने आज पुन्हा भाव खाला आहे. गेल्या कित्येक हजार वर्षांपासूनचं भारतीयांचं सोन्याचं वेडं आज ही कायम आहे. सोन्याबाबत आज एक जोरदार बातमी आली आहे. त्याचा परिणाम थेट सोन्यासंबंधीचे शेअर आणि ज्वेलरी शेअरवर दिसून आला. वाणिज्य मंत्रालयाने, सोन्यावरील आयात शुल्क (Gold Import Duty) 4 टक्के करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सध्या सोन्यावर 7.5 टक्के आयात शुल्क मोजावे लागते. सोबतच 2.5 टक्क्यांचा कृषी सेस (Agriculture Cess) वेगळा आकारला जातो. त्यामुळे सोन्यावर एकूण 10 टक्के आयात शुल्क मोजावे लागते आणि इथंच खरी गोम आहे. कारण या 10 टक्के आयात शुल्क वाचाविण्याच्या नादात सोन्याची तस्करी मोठ्या प्रमाणात देशात सुरु आहे. देशात येणा-या एकूण सोन्यात तस्करीने येणारे सोने 25 टक्के इतके आहे. हा खूप मोठा आकडा आहे.
म्हणजे सरकारने एकीकडे कर वाढविला आहे. तो नफा कमविण्यासाठी. तर दुसरीकडे लोकांनी पळवाट शोधली आहे ती कर चुकविण्यासाठी अशा परिस्थितीत सरकारला 25 टक्के सोन्याच्या आयातीवरील करावर पाणी सोडावं लागत आहे, हे स्पष्ट आहे. त्यामुळे शुल्क आकारणी कमी केल्यास चोरट्या मार्गाने होणारी सोन्याची आयात कमी होईल आणि सरकारी तिजोरीत गंगाजळी वाढेल असा सरकारचा व्होरा आहे. हा झाला सरकारचा फायदा. सर्वसामान्यांच्या हातात यामुळे काय पडेल तर देशात सोन्याच्या किंमतीत जी अचानक उसळी आली होती. ती स्थिर होण्याची चिन्हे दिसतील. आज पन्नाशीच्या आसपास असलेले सोनं काही अंशी तरी घसरेल. मात्र काही दिवसानंतर या धोरणाचे दृष्य परिणाम समोर येतील.
चला तर आकडेवारी समजून घेऊयात
सर्वात महत्वाचे म्हणजे सरकारने जो द्रविडी प्राणायाम सुरु ठेवला होता. त्याला लोकांचाच विरोध होता. आयात शुल्क कमी करण्याची मागणी फार आधिपासून करण्यात येत होते. देर आये दुरुस्त आये म्हणत वाणिज्य मंत्रालयाने आयात शुल्क घटविण्याचा प्रस्ताव सादर केल्याने या मागणीला बळ मिळाले आहे. जगातील सर्वात मोठ्या सोने आयात करणा-या देशांच्या यादीत भारत वरच्या क्रमांकावर आहे. यावर्षी एकट्या भारताने 900 टन सोनं आयात केलं आणि गेल्या सहा वर्षांतील ही सर्वात मोठी मागणी नोंदवली गेली. वित्तमंत्र्यांनी सोन्यावरील आयात शुल्क 12 टक्क्यांहून 7.5 टक्के इतके करण्याची मागणी केली होती. त्यावेळी गोल्ड इंडस्ट्रीने त्याचे मोठे स्वागत केले होते.
सोन्याच्या तस्करीला आळा बसणार
वाणिज्य मंत्रालयाच्या शिफारशींचा विचार करता, या निर्णयाचा थेट परिणाम सोन्याच्या तस्करीवर होणार आहे. सूत्रांच्या माहितीवर विश्वास ठेवल्यास देशात मोठ्या प्रमाणात सोनं हे तस्करीने आणले जाते. त्यामुळे आयात शुल्क बुडते. सरकारचा मोठा घाटा होतो. आता विचार करा यंदा 900 टन सोनं देशानं आयात केलं. त्यातील 25 टक्के सोनं हे स्मगलिंग रुपात आल्याचा अंदाज आहे. म्हणजे जवळपास 200 ते 250 टन. त्यावरील आयात शुल्काचा विचार करता सरकारला दरवर्षी अशा प्रकारामुळे कोट्यवधींचा चूना लागतो हे स्पष्ट आहे.
सोन्याची हाव कमी होईना
भारतीयांची सोन्याची हाव कधी कमी होणार हा प्रश्न प्रत्येक सरकारला सतावत असतोच. कारण आयातीपोटी गंगाजळी परकिय देशाकडे जाते. कोरोना काळातही गेल्यावर्षी देशात 350 टन सोनं आयात करण्यात आलं होतं. त्यावेळी हे आकडे डोळे दिपवणारे आणि अविश्वसनीय वाटतं होते. मात्र यंदा तर त्याहून कहर झाला. भारतीयांनी तब्बल 900 टन सोने आयात केले. हा गेल्या 6 वर्षांतील रेकॉर्ड आहे.
सोन्याचे भाव 46000 हजारांच्या घरात
आता या निर्णयाचा सर्वात जास्त परिणाम भारतीय सोने बाजारात दिसून येईल. या निर्णयामुळे ग्राहकांना दिलासा मिळेल. सोन्याच्या किंमती पूर्वीच्या किंमतीपासून कमी झालेल्या दिसतील. सोन्याने मध्यंतरी पार 52 हजारांच्या घरात व त्याही पुढे उसळी मारली होती. मात्र तरीही सोने खरेदीदारांची संख्या फार काही रोडावली नाही. एका अंदाजानुसार, सोन्याचे भाव प्रति 10 ग्राम 45 ते 46 हजार राहण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या :
शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्समध्ये 700 अकांची घसरण, गुंतवणूकदारांना मोठा फटका
CBDC | आता भारताची स्वतःची डिजिटल करन्सी, CBDC चं रुपडं लवकरच लाँच होणार