मोठी बातमी: भारताच्या सोने आयातीमध्ये मोठी वाढ; अर्थव्यवस्थेला फटका
Gold Import | तर दुसरीकडे यंदा चांदीची झळाळी मात्र कमी होताना दिसत आहे. एप्रिल-जून तिमाहीत चांदीची आयात 93.7 टक्क्यांनी घसरून 3.91 कोटी डॉलर्स इतकी राहिली.
मुंबई: चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून सोन्याच्या आयातीत वाढ होण्याचा सुरु झालेला शिरस्ता अद्यापही कायम आहे. कारण एप्रिल-जून तिमाहीत देशातील सोन्याच्या आयातीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे चालू खात्यातील तूट आणखी वाढली असून हे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी फारसे चांगले लक्षण नाही. एप्रिल-जून तिमाहीत सोन्याची आयात 7.9 अब्ज डॉलर्सनी वाढून 58,572.99 कोटी रुपयांवर पोहोचली.
यापूर्वी एप्रिल- मे महिन्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत कितीतरी अधिकपट सोन्याची आयात (Gold Import) नोंदवण्यात आली होती. भारत हा जगात चीननंतर सोन्याचा सर्वात मोठा आयातदार देश आहे. भारतात प्रामुख्याने दागिन्यांसाठी सोन्याचा वापर केला जातो. त्यासाठी दरवर्षी 800 ते 900 टन सोने आयात केले जाते.
तर दुसरीकडे यंदा चांदीची झळाळी मात्र कमी होताना दिसत आहे. एप्रिल-जून तिमाहीत चांदीची आयात 93.7 टक्क्यांनी घसरून 3.91 कोटी डॉलर्स इतकी राहिली.
भारतीय बाजारपेठेत सध्या सोन्याचा दर काय?
भारतीय बाजारपेठेत सध्या सोने 47 हजाराच्या पातळीच्या आसपास आहे. शनिवारी बाजार बंद झाला तेव्हा सोन्याचा प्रतितोळा दर 47526 रुपये होता. आगामी काळात सोन्याच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळू शकते. त्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणुकीसाठी आताच योग्य संधी असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
भारताच्या परकीय चलनाच्या गंगाजळीला गळती
कोरोना संकटामुळे एकीकडे भारतीय अर्थव्यवस्था रोडावली असताना परकीय चलनाच्या गंगाजळीत मोठी घट झाल्याने देशाला मोठा झटका बसला आहे. सोन्याच्या दरात (Gold Rate) झालेल्या मोठ्या घसरणीमुळे हा परिणाम पाहायला मिळत आहे. 18 जूनला परकीय चलन गंगाजळी 4.148 अब्ज डॉलर्सच्या विक्रमी पातळीवरुन 603.933 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आली आहे.
परकीय मुद्रा भांडारातील युरो, पाऊंड आणि येनच्या या परकीय चलनांच्या विनिमय दरात मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. यापूर्वी 4 जून रोजी Forex Reserves वाढ पाहायला मिळाली होती. कोरोनाच्या संकटकाळातही परकीय गुंतवणुकदारांनी भारतावर विश्वास ठेवला होता. त्यामुळे भारताची परकीय चलनाची गंगाजळी 600 अब्ज डॉलर्सवर जाऊन पोहोचली होती.
संबंधित बातम्या:
चालू आर्थिक वर्षात सोन्याच्या आयातीत 3.3 टक्के घट, व्यापार तूट कमी करण्यास मदत
Gold: अबब! कोरोनाच्या संकटकाळातही भारतात इतक्या टन सोन्याची आयात
Gold: देशात एप्रिल-मे महिन्यात सोन्याची प्रचंड आयात; भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका