गुजरातच्या तरुणाने आई-वडिलांकडून 8000 रुपये उधार घेऊन टाकली चहाची टपरी; अवघ्या चार वर्षात कोट्यधीश
MBA Chaiwala | नापास झाल्यामुळे महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडलेल्या प्रफुल्लने एक चहाची टपरी टाकली. मात्र, पुढे जाऊन हा व्यवसाय इतका वाढला की संपूर्ण देश त्याला 'चायवाला' या नावाने ओळखू लागला. अवघ्या चार वर्षात त्याच्या कंपनीची उलाढाल 3 कोटींवर जाऊन पोहोचली.
नवी दिल्ली: अगदी लहानसहान नोकरी किंवा व्यवसायपासून सुरुवात करून श्रीमंत झालेल्या लोकांच्या गोष्टी भारतासाठी काही नवीन बाब नाही. अहमदाबादचा प्रफुल्ल बिलौरे हादेखील अशाच लोकांच्या पंक्तीमधील एकजण. परिस्थितिशी दोन हात करत प्रफुल्लने मिळवलेले यश अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
नापास झाल्यामुळे महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडलेल्या प्रफुल्लने एक चहाची टपरी टाकली. मात्र, पुढे जाऊन हा व्यवसाय इतका वाढला की संपूर्ण देश त्याला ‘चायवाला’ या नावाने ओळखू लागला. अवघ्या चार वर्षात त्याच्या कंपनीची उलाढाल 3 कोटींवर जाऊन पोहोचली.
…आणि प्रफुल्लने चहाची टपरी सुरु केली
प्रफुल्ल बिलौरे महाविद्यालयात असताना त्याला एमबीएचे शिक्षण पूर्ण करायचे होते. त्याला IIM सारख्या संस्थेत शिकायचे होते. त्यासाठी प्रफुल्लने कॅटची परीक्षाही दिली होती. मात्र, या परीक्षेत त्याला अपयश आले. त्यानंतर काही काळ प्रफुल्ल निराशेच्या गर्तेत ढकलला गेला. त्याने अनेक दिवस खोलीत स्वत:ला कोंडून घेतले होते. काही दिवसांनी तो एका पिझ्झा शॉपमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून कामाला लागला. या काळात प्रफुल्लला तासाला 37 रुपये या हिशेबाने पैसे मिळायचे.
काही दिवसांत याठिकाणी प्रफुल्लला प्रमोशन मिळाले. मात्र, प्रफुल्लला आयुष्यात काहीतरी वेगळे करून दाखवायचे होते. त्यामुळेच प्रफुल्लने स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी प्रफुल्लने आई-वडिलांकडून 8000 रुपये उधार घेतले आणि अहमदाबाद एसजी महामार्गावर चहाची टपरी सुरु केली.
MBA चायवाला
सुरुवातीच्या काळात प्रफुल्लची चहाची टपरी खास चालत नव्हती. त्यामुळे प्रफुल्लने फक्त टपरीवर चहा न विकता तो लोकांपर्यंत जाऊन विकण्याचा प्लॅन आखला. प्रफुल्ल चहा देण्यासाठी अनेकांना भेटायचा तेव्हा इंग्रजीत बोलत असे. हे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसायचा. त्यानंतर प्रफुल्लच्या चहाच्या व्यवसायाने वेग पकडला.
लोकांच्या मनोरंजनासाठी प्रफुल्लने आपल्या टपरीवर ओपन माईक लावला होता. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी सिंगल तरुणांना मोफत चहा दिला. ही बातमी तेव्हा प्रचंड व्हायरल झाली. त्यानंतर प्रफुल्लने लग्नांमध्ये चहाचा स्टॉल लावायला सुरुवात केली. प्रफुल्लने आपल्या चहाच्या टपरीचे नाव मिस्टर बिलौरे अहमदाबाद चायवाला’ असे ठेवले होते. लोकांनी त्याचा शॉर्टफॉर्म करुन MBA चायवाला म्हणायला सुरुवात केली आणि पुढे हेच नाव लोकप्रिय झाले.
परिस्थितिशी दोन हात
प्रफुल्लचा हा संपूर्ण प्रवास अगदीच सोपा नव्हता. सुरुवातीला त्याने चहाची टपरी सुरु केली तेव्हा घरातल्यांनी आणि मित्रांनी त्याला बऱ्याच गोष्टी ऐकवल्या. मध्यंतरीच्या काळात महानगरपालिकेने त्याची टपरी उचलून नेली. अनेकदा गुंडांनीही पैशासाठी त्याला धमकावले. अनेकजण प्रफुल्लला चहावाला म्हणून हिणवायचे. मात्र, आज इतक्या वर्षानंतर याच ओळखीमुळे प्रफुल्ल कोट्यधीश झाला आहे.
फ्रेंजायजी घेण्यासाठी लोकांच्या रांगा
प्रफुल्लचा MBA चायवाला हा ब्रँड गुजरातमध्ये चांगलाच लोकप्रिय झाला होता. आजही अनेकजण MBA चायवालाची फ्रेंजायजी मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. आजघडीला देशभरात MBA चायवालाच्या देशभरात 11 फ्रेंचायजी आहेत. प्रफुल्ल आता केवळ एक उद्योगपती राहिला नसून मोटिव्हेशनल स्पीकर झाला आहे. प्रफुल्ल बिलौरे आज कोणत्याही लग्नामध्ये दिवसभर चहाचा स्टॉल लावण्यासाठी 50 हजार रुपये आकारतो.
संबंधित बातम्या:
वडील विकायचे फळं, मुलाने बनवलं ‘नॅचरल्स आईस्क्रीम’; उभारला 300 कोटींचा व्यवसाय