Mercedes Benz | मर्सिडीज बेंझची वाढली मार्केट व्हॅल्यू, 3 महिन्यांत वाहनांची रेकॉर्डब्रेक विक्री
मर्सिडीज बेंझ इंडियाने 2022 च्या पहिल्या तिमाहीत 4022 युनिट्सची विक्री केली. मागील वर्षीच्या तुलनेत यात तब्बल 26 टक्क्यांनी वाढ झाली असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. भारतात आतापर्यंत कोणत्याही तिमाहीत कंपनीची ही सर्वाधिक विक्री आहे. मर्सिडीज बेंझ इंडियाकडे आता 4000 प्लस युनिट्सची ऑर्डर बँक आहे.
मर्सिडीज बेंझला (Mercedes Benzs) गाडीच्या निर्मितीपासून ते आजपर्यंत खूप लोकप्रियता मिळाली आहे. त्यामुळे या गाडीची मार्केट व्हॅल्यूदेखील कधीही कमी झाल्याचे दिसून आले नाही. कारप्रेमी आपल्या कलेक्शनमध्ये एकतरी मर्सिडीज बेंझ हमखास ठेवतच असतात. या गाडीची क्रेझ बघता कंपनीनेही अनेक वेळा आपल्या या लोकप्रिय (Popular) वाहनाला वेळोवेळी अपग्रेड केलेले दिसून येते. मर्सिडीज बेंझ इंडियाने 2022 च्या पहिल्या तिमाहीत 4022 युनिट्सची विक्री केली, जी मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 26 टक्क्यांनी वाढली आहे. भारतातील कंपनीच्या आतापर्यंतच्या इतिहासातील ही सर्वोच्च वाढ व विक्री (sales) असल्याचे सांगण्यात येत आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, सर्वाधिक मागणी एसयूव्ही आणि सेडान सेगमेंटमध्ये असल्याचे दिसून येत आहे.
‘सुपर लक्झरी कार’मध्ये 35 टक्के वाढ
या कालावधीत ई-क्लास LWB हे सर्वाधिक विकले जाणारे मॉडेल राहिले, त्यानंतर GLC SUV लादेखील चांगली मागणी राहिली. ICOTY ‘लक्झरी कार ऑफ द इयर’ ठरली. नवीन S-क्लास, 2021 मध्ये लाँच झाल्यापासून भारतीय बाजारपेठेत तिचा दबदबा कायम राहिला. कंपनीच्या म्हणण्यानुसार, जीएलई आणि जीएलएस एसयूव्हीला सर्वाधिक मागणी नोंदवण्यात आली आहे. मर्सिडीज बेंझने दिलेल्या माहितीनुसार, AMG आणि सुपर लक्झरी कार सेगमेंटमध्ये 35 टक्के वाढ झाली आहे.
ग्राहकांकडून मोठी मागणी
मर्सिडीज बेंझच्या म्हणण्यानुसार, बहुतेक मॉडेल्सचा प्रतीक्षा कालावधी कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. नेमकी कंपनीची बंपर विक्री अशा वेळी आली आहे, ज्यावेळी सेमीकंडक्टरचा तुटवडा आणि इनपुट खर्च वाढला आहे. त्यामुळे ही कंपनीसाठी सर्वात मोठी आव्हाने आहेत. दरम्यान, गेल्या महिन्यातच मर्सिडीज बेंझ इंडियाने आपल्या वाहनांच्या किमती वाढवून ग्राहकांना मोठा धक्का दिला होता, परंतु त्यानंतरही या वाहनांना ग्राहकांकडून मोठी मागणी आहे.