Swiss bank मधील भारतीयांच्या वाढत्या पैशांचं वृत्त केंद्र सरकारने फेटाळलं, बँकेकडे पुरावे मागितले
स्विस बँकेने त्यांच्याकडे यंदा कोरोनाच्या काळातही भारतीयांकडून जमा करण्यात आलेल्या पैशांमध्ये वाढ झाल्याची आकडेवारी जाहीर केली. यानंतर या स्विस बँकेतील पैशांवरुन भारतात रणकंदन माजलं.
नवी दिल्ली : स्विस बँकेने त्यांच्याकडे यंदा कोरोनाच्या काळातही भारतीयांकडून जमा करण्यात आलेल्या पैशांमध्ये वाढ झाल्याची आकडेवारी जाहीर केली. यानंतर या स्विस बँकेतील पैशांवरुन भारतात रणकंदन माजलं. विरोधकांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ले चढवले. तसेच निवडून येण्याआधी काळा पैसा परत आणण्याच्या आश्वासनांची आठवण करुन देण्यात आली. यानंतर आता केंद्रातील मोदी सरकारने स्विस बँकेची ही आकडेवारीच मानण्यास नकार दिलाय. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने शनिवारी (19 जून) ही माहिती चुकीची असल्याचा दावा केलाय. तसेच स्विझरलँडमधील स्विस बँकेत (Swiss Bank) भारतीय ग्राहकांकडून जमा होणाऱ्या रकमेत 2019 मध्ये घट झाल्याचा दावा केलाय (Modi Government deny increase in swiss bank amount ask details to bank).
काळ्या पैशावरुन टीका झाल्यानंतर मोदी सरकारने स्विस बँकेची आकडेवारीच मानण्यास नकार दिलाय. तसेच स्विस बँकेकडे याबाबत पुरावे मागितले आहेत. याशिवाय 2020 मध्ये व्यक्ती आणि संस्थांकडून जमा करण्यात आलेल्या पैशांच्या आकडेवारीत बदल होण्याची कारणांचीही माहिती मागितली आहे.
स्विस बँकेतील 2020 च्या भारतीयांच्या पैशांमध्ये 20,700 कोटी रुपयांची वाढ
स्विस बँकेतील भारतीयांच्या काळ्या पैशात वाढ झाल्याच्या वृत्त अर्थ मंत्रालयाने फेटाळलं आहे. 17 जून रोजी स्विस बँकेच्या अधिकाऱ्यांनी बँकेतील जमा रकमेची आकडेवारी जाहीर केली होती. त्यानुसार स्विस बँकेतील 2020 च्या भारतीयांच्या पैशांमध्ये 20,700 कोटी रुपयांची वाढ झालीय. इतकंच नाही ही रक्कम मागील 13 वर्षांमधील सर्वोच्च असल्याचंही नमूद करण्यात आलेय.
“इतर कारणांमुळे भारतीयांनी जमा केलेल्या पैशांमध्ये वाढ”
अर्थ मंत्रालयाने म्हटलं, “स्विस नॅशनल बँकेच्या (एसएनबी) अहवालात दिलेली आकडेवारी काळ्या पैशांचा सूचक नाही. या आकडेवारीत भारतीयांनी, एनआरआय किंवा इतरांकडून परदेशातील संस्थांच्या नावे जमा करण्यात येणाऱ्या काळ्या पैशांचा समावेश नाही. इतर कारणांमुळे भारतीयांनी जमा केलेल्या पैशांमध्ये वाढ झाली असावी. यात भारतीय कंपन्यांकडून व्यापारात झालेली वृद्धी आणि इतर कारणांमुळे ही वाढ असावी.”
स्विस बँकेने दिलेली आकडेवारी काय?
आकडेवारीनुसार, 2019 च्या अखेरीस स्विस बँकेत भारतीयांनी जमा केलेल्या पैशांची रक्कम जवळपास 89.9 कोटी फ्रँक्स (6,625 कोटी रुपये) होती. 2020 च्या अखेरीस ही एकूण रक्कम वाढून 20,706 कोटी रुपये इतकी झाली. या रकमेत 4,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक कस्टमर डिपॉजिट, 3100 कोटी रुपयांपेक्षा अधिक दुसऱ्या बँकांच्या माध्यमातून, 16.5 कोटी रुपये ट्रस्टच्या माध्यमातून आणि जवळपास 13,500 कोटी रुपये बॉन्ड, सिक्युरिटीज आणि वेगवेगळ्या आर्थिक पर्यायांशी संबंधित गोष्टींचा समावेश आहे.
2006 मध्ये नवा विक्रम
या आकडेवारीनुसार, भारतीयांनी स्विस बँकेत पैसे जमा करण्याचा याआधीचा विक्रम 2006 मध्ये झाला होता. त्यावेळी भारतीयांनी जवळपास 6.5 अब्ज स्विस फ्रँक्स जमा केले होते. असं असलं तरी 2011, 2013 आणि 2017 या वर्षांना सोडलं तर बहुतांश वर्षी यात घट झालीय.
हेही वाचा :
कोरोना काळात भारतीयांनी सर्वात जास्त पैसे स्विस बँकेत टाकले, 13 वर्षांचा विक्रम मोडला
Assembly Elections 2021 : निवडणुकीत पैशांचा पाऊस, आयोगाकडून 5 राज्यांमध्ये आतापर्यंत 331 कोटी जप्त, कोणत्या राज्यात किती?
निवडणुकीत काळा पैसा वापरणाऱ्या नेत्यांची अडचण, प्रत्येकावर पोलिसांची नजर
व्हिडिओ पाहा :
Modi Government deny increase in swiss bank amount ask details to bank