रिलायन्समध्ये होणार नेतृत्वबदल; मुकेश अंबानींनी दिले निवृत्तीचे संकेत, कोण होणार उत्तराधिकारी?
मुकेश अंबानी यांचे सध्याचे वय 64 वर्षे आहे. त्यांना आकाश, ईशा आणि अनंत अशी तीन मुले आहेत. यापैकी त्यांची जागा कोण घेणार, याची चर्चा आता सुरू झाली आहे.
मुंबईः अखेर देशातल्या बलाढ्य अशा रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये नेतृत्वबदलाची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याचे स्पष्ट संकेत RILचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी दिले. धीरूभाई अंबानी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कंपनीच्या फॅमिली डे कार्यक्रमात त्यांनी निवृत्तीची भाषा केली आणि आम्ही फक्त त्यांना मार्गदर्शन केले पाहिजे. सक्षम केले पाहिजे. प्रोत्साहन दिले पाहिले. त्यांनी आमच्यापेक्षा जास्त यश मिळवल्यामुळे शांत बसून टाळ्या वाजवल्या पाहिजेत, असा स्पष्ट उल्लेख केला. त्यामुळे आता रिलायन्सचा उत्तराधिकारी म्हणून पुढे कोण येणार, याची उद्योग जगतात चर्चा सुरू झाली आहे.
अंबानींना तीन मुले
मुकेश अंबानी यांचे सध्याचे वय 64 वर्षे आहे. त्यांनी 2002 मध्ये वडिलांच्या निधनानंतर RILचे अध्यक्षपद भूषवले. तिथून त्यांनी केलेली प्रगती साऱ्या देशाने पाहिली. त्यांना आकाश, ईशा आणि अनंत अशी तीन मुले आहेत. ही तिन्ही मुले RILच्या दूरसंचार, किरकोळ आणि ऊर्जा व्यवसायाचे काम पाहतात. मात्र, यापैकी RILच्या संचालक मंडळावर कोणीही नाही. ते कंपनीच्या प्रमुख शाखांमध्ये संचालक म्हणून काम पाहतात.
अंबानी म्हणतात…
मुकेश अंबानी कार्यक्रमात म्हणाले की, आम्ही फक्त त्यांना मार्गदर्शन केले पाहिजे. सक्षम केले पाहिजे. प्रोत्साहन दिले पाहिले. त्यांनी आमच्यापेक्षा जास्त यश मिळवल्यामुळे शांत बसून टाळ्या वाजवल्या पाहिजेत. मला यात शंका नाही की आकाश, ईशा आणि अनंत हे पुढच्या पिढीचे नेतृत्व म्हणून रिलायन्सला आणखी उंच अशा यशाच्या शिखरावर नेतील. रिलायन्सप्रती त्यांची उत्कटता, वचनबद्धता आणि निष्ठा मी दररोज पाहू आणि अनुभवू शकतो. लाखो लोकांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी आणि भारताच्या विकासात योगदान देण्यासाठी माझ्या वडिलांची तीच ठिणगी आणि क्षमता मला त्यांच्यामध्ये दिसते, असे कौतुकही त्यांनी यावेळी केली.
सर्वात मोठे ग्रोथ इंजिन
मुकेश अंबानी म्हणाले की, मोठ्या संधीचा फायदा घेऊन आरआयएलच्या भविष्यातील वाढीचा पाया घालण्याची वेळ आली आहे. कापड कंपनी म्हणून सुरू झालेली RIL, विविध व्यावसायिक हितसंबंध असलेल्या समूहात रूपांतरित झाली आहे. ज्यांची उत्पादने दररोज लोकांच्या जीवनाला स्पर्श करतात. आम्ही आमचा ऊर्जा व्यवसाय पूर्णपणे री-इंजिनियर केला आहे. आता, रिलायन्स स्वच्छ आणि हरित ऊर्जा आणि सामग्रीमध्ये जागतिक आघाडीवर आहे. आमच्या जुन्या व्यवसायाचे हे परिवर्तन आम्हाला रिलायन्ससाठी सर्वात मोठे ग्रोथ इंजिन ठरेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
आत्ताच निवृत्ती का?
सूचीबद्ध कंपन्यांमधील अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदे विभाजित करण्यासाठी सेबीने मुदतवाढ दिली आहे. सेबीचे अध्यक्ष अजय त्यागी यावर म्हणालेत की, आम्ही अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदाचे विभाजन करण्यासाठी उद्योगाला पुरेसा वेळ दिला आहे. मी फक्त उद्योगाला त्याचे पालन करण्याचे आवाहन करू शकतो. आता मुकेश अंबानी या संधीचा फायदा घेऊ इच्छितात.
इतर बातम्याः