32,000 कोटींची मालकीण, वारसदार कोणीच नाही; किरण यांचा व्यवसाय कोण सांभाळणार?
अनेक उद्योग घराणी देशात आहेत. त्यांचा हजारो, कोटी आणि अब्जावधी डॉलरचा बिझनेस आहे. उद्योगांचं साम्राज्य आहे. पण काही घराणी अशी आहेत की त्यांना सांभाळणारा वारसदारच नाही. त्यामुळे ही संपत्ती कोण सांभाळणार असा प्रश्न नेहमी विचारला जातो.

नवी दिल्ली | 26 सप्टेंबर 2023 : आपल्या देशाने अनेक उद्योगपती घडवले आहेत. आणि उद्योगपतींनी या देशाला आकार देण्याचं काम केलं आहे. उद्योगपती भरपूर झाले आहेत. पण महिला उद्योजक फार कमी झाल्या आहेत. किरण मजूमदार शॉ या अशाच मोजक्या महिला उद्योजकांपैकी एक आहेत. तब्बल 45 वर्षांपूर्वी त्यांनी ‘Biocon’ ही कंपनी सुरू केली होती. आज या कंपनीची व्हॅल्यू 32,000 कोटी एवढी आहे. पण त्यांच्या या अफाट साम्राज्याचं काय होणार? हे सांगता येत नाही. कारण किरण मजुमदार शॉ यांच्या मागे कोणीच वारस नाहीये.
अब्जावधीची कोरोडोंची संपत्ती आहे, पण ती सांभाळणारा कोणीच नाही अशी अनेक घराणी भारतात आहेत. किरण मजूमदार शॉही त्यापैकी एक आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात त्यांचे पती जॉन शॉ यांचं वयाच्या 73व्या वर्षी निधन झालं. किरणही आता वयाच्या सत्तरीत पोहोचल्या आहेत.
फक्त 10 हजार रुपयात सुरुवात
किरण मजूमदार शॉ यांनी 1978मध्ये केवळ 10 हजार रुपये गुंतवून बायोकॉन कंपनीची सुरुवात केली होती. अमेरिका आणि यूरोपात एंजाइम्सची निर्यात करणारी ही देशातील पहिली कंपनी होती. आजही देशातील सर्वात मोठी जेनेरिक एपीआय (औषधांमध्ये वापरला जाणारा फॉर्म्युला) बनविणाऱ्या कंपनींपैकी एक आहे.
अशी आहे प्रेम कहाणी
त्यांनी 1998मध्ये जॉन शॉ यांच्याशी विवाह केला होता. दोघांचा हा प्रेम विवाह होता. त्यांची प्रेम कहाणीही वेगळी आहे. जॉन आणि किरण यांची पहिली भेट 1990च्या जवळपास झाली होती. जॉन एका यूपीयन कंपनीत काम करत होते. बंगळुरूत हे दोघे भेटले. त्यावेळी आपल्यात काही तरी समान धागा आहे, असं या दोघांना वाटलं. नंतर जॉन यांना त्यांच्या कंपनीने परत यूरोपला बोलावून घेतलं. मात्र, किरण यांना जॉन यांचा विरह सहन होईना. शेवटी दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. किरण यांच्याशी विवाह करण्यासाठी जॉन यांनी स्वेच्छा निवृत्तीही घेतली.
ट्रस्ट करणार?
किरण यांना संतान नाहीये. तसेच त्यांचा उत्तराधिकारी कोण असेल हे सुद्धा त्यांनी कधी स्पष्ट केलं नाही. मात्र, बायोकॉन प्रोफेशनल्सच्या हातात सर्व सूत्रे दिली जाण्याची शक्यता काही जाणकार वर्तवत आहेत. किरण मजूमदार शॉ या एखादी ट्रस्ट तयार करून रतन टाटा यांच्या प्रमाणे कंपनीची सूत्रे आपल्याकडे घेण्याची शक्यता आहे, असं सांगितलं जातं.
सीएकडे जबाबदारी दिली
देशातील उद्योग घराण्यांपैकी बिर्ला घराण्याचा एक किस्सा आहे. उद्योजिका प्रियंवदा देवी बिर्ला यांनाही मुलबाळ नव्हतं. त्यामुळे त्यांनी त्यांची संपूर्ण संपत्ती चार्टड अकाऊंटला दिली होती. त्यात एमपी बिर्ला ग्रुपही सामील होता. प्रियवंदा देवी बिर्ला यांची हे मृत्यू समोर आल्यानंतर त्याची जोरदार चर्चा झाली होती.