नाशिक डीसीसी बँक फोडली, पण रोकड थोडक्यात वाचली!
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक फोडल्याचा प्रकार जायखेडा (जि. नाशिक) येथे घडला. मात्र, नाना प्रयत्न करूनही तिजोरीतील रोकड लांबवण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला.

नाशिकः नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक फोडल्याचा प्रकार जायखेडा (जि. नाशिक) येथे घडला. मात्र, नाना प्रयत्न करूनही तिजोरीतील रोकड लांबवण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला.
या अपयशी ठरलेल्या चोरीबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जायखेडा येथील मुख्य बाजारपेठेत शाखा आहे. या बँकेत जवळपास दोन लाखांची रोकड होती. त्यात वीजबिल भरणा आणि इतर वसुलीच्या रकमेचा समावेश होता. चोरट्यांनी शुक्रवारी मध्यरात्री बँकेचे मुख्य शटर फोडले. इतर साहित्याची तोडफोड केली. मात्र, त्यांना बँकेची तिजोरी काही केल्या फोडायला जमली नाही. त्यामुळे ही रक्कम वाचली. दुसरीकडे या शाखेतील सीसीटीव्ही यंत्रणा आणि अलार्म बंद असल्याचे समोर आले आहे. पोलीस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. दरम्यान, चोरीच्या अशा घटना रोखल्या जाव्यात म्हणून बँकेने सीसीटीव्ही यंत्रणा दुरुस्त करून घ्यावी, बंद पडलेला अलार्म सुरू करावा आणि येथे एक सुरक्षारक्षक नेमावा, अशी मागणी होत आहे.
एटीएम फोडून 22 लाख 71 हजार 300 रुपये लंपास
गॅस कटरने एटीएमचे तुकडे करून तब्बल 22 लाख 71 हजार 300 रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना सिन्नरमधल्या सरदवाडीत (जि. नाशिक) मध्यरात्री घडली आहे. सिन्नरमधल्या सरदवाडी येथे हॉटेल अजिंक्यताराजवळ अॅक्सीस बँकेचे एटीएम आहे. चोरट्यांनी या एटीमची फोडी केली. गुरुवारी मध्यरात्री एकच्या सुमारास एटीएममध्ये प्रवेश केला. आपण कुणाच्याही जाळ्यात सापडू नये म्हणून सीसीटीव्हीचे केबल कनेक्शन तोडून टाकले. त्यानंतर सोबत असलेल्या गॅस कटर मशीनने एटीएमचे तुकडे केले. शटर बंद करून चोरट्यांनी डाव साधला. रोकड लंपास केल्यानंतरही शटर बंद ठेवले. दसऱ्यादिवशी दुपारपर्यंत एटीएमचे शटर बंदच होते. मात्र, शुक्रवारी दसरा सणानिमित्त पैसे काढायचे म्हणून अनेक ग्राहक तिथे येऊन गेले. एक ग्राहक बराच वेळ थांबला. त्याने शटर वर करून पाहिले. तेव्हा एटीएम फोडल्याचा प्रकार समोर आला. या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली.
इतर बातम्याः
फडणवीस ‘क्लीन मास्टर’, भुजबळांची सडकून टीका; ठाकरे-पवारांसारखेच मुख्यमंत्री लक्षात राहतात…!
नाशिकमध्ये पुन्हा पाऊस मुक्कामी; हवामान विभागाचा अंदाजhttps://t.co/mMC3VyKkpC#Weather|#WeatherForecast|#NorthMaharashtra|#Rain|#Nashik
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 16, 2021