औरंगाबादच्या 30-30 योजनेच्या मास्टरमाइंडला अखेर बेड्या, शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये लुबाडल्याचा आरोप!
शुक्रवारी त्याच्यावर गुन्हा दाखल होताच बिडकीन पोलिसांनी संतोष राठोडचा शोध घेतला असता तो कन्नड तालुक्यातील मुंडवाडी तांडा येथील त्याच्या घरी असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याच्या घराला घेराव घालत ताब्यात घेतलं.
औरंगाबादः जिल्ह्यातील बहुचर्चित 30-30 घोटाळ्याच्या (30-30 Scam) सूत्रधाराला शुक्रवारी पोलिसांनी अखेर अटक केली. कन्नड येथील त्याच्या घराला घेराव घालत पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. मराठवाड्यासह राज्यभरातील शेतकऱ्यांना 30 टक्के व्याजासह पैसे परत देण्याच्या नावाखाली याने हजारो शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्याचा आरोप आहे. शुक्रवारी एका तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनंतर औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी संतोष राठोड (Santosh Rathod) याला कन्नड येथील घरातून अटक केली.
काय आहे 30-30 घोटाळा?
मराठवाड्यात DMIC प्रकल्पात शेकडो शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित करण्यात आली. सरकारने याचा मोबदला शेतकऱ्यांना दिला. आता शेतकऱ्यांकडे बक्कळ पैसा आहे, हे पाहून औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील संतोष राठोड नावाच्या तरुणाने शेतकऱ्यांसाठी गुंतवणुकीची एक योजना आणली. मासिक 30 टक्के परतावा मिळवून देतो, असे सांगण्यात आले. सुरुवातीला संतोषने शेतकऱ्यांना परतावाही दिला, त्यामुळे योजनेची व्याप्ती हळू हळू बिडकीन, पैठण, औरंगाबादमधील इतर तालुक्यांसह महाराष्ट्रात वाढत गेली. लोकांनी घरं, जमिनी विकून त्याच्याकडे पैसे गुंतवले. मात्र वर्षभरापासून शेतकऱ्यांना व्याज नाही आणि मुद्दलाचे पैसेही परत मिळालेले नाहीत.
30-30 नंबरच्या पॉश गाड्या, पैशांसाठी पोते!
ग्रामीण भागातील लोकांवर भुरळ टाकण्यासाठी संतोष राठोडने वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरल्याचे बोलले जाते. 30-30 नंबरच्या आलिशान गाड्यांचा ताफा गावात येत, सुटा-बुटातले लोक योजनेसंबंधी माहिती सांगत. तसेच गावातील लोकांकडून जी रक्कम घ्यायचीय, ती केवळ रोकड पद्धतीचे घ्यायची, अशी त्यांची पद्धत होती. त्यामुळे या व्यवहाराचे कोणतेही लेखी पुरावे शेतकऱ्यांकडे नाहीत. लोकांकडून घेतलेल्या पैशांवर याने अनेक विदेश वाऱ्याही केल्याचे सांगितले जात आहे. शुक्रवारी त्याच्यावर गुन्हा दाखल होताच बिडकीन पोलिसांनी संतोष राठोडचा शोध घेतला असता तो कन्नड तालुक्यातील मुंडवाडी तांडा येथील त्याच्या घरी असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याच्या घराला घेराव घालत ताब्यात घेतलं. रात्री त्याला बिडकीन पोलीस ठाण्यात हजर करत अटक करण्यात आली. आज शनिवारी संतोष राठोड याला न्यायालयात हजर केले जाईल.
इतर बातम्या-