VIDEO : काळ आला होता पण वेळ नाही, जालन्यात पुलावरुन जाताना बस नदीत कोसळली, गावकऱ्यांनी 23 प्रवाशांचे प्राण वाचवले
जालना जिल्ह्यात गुरुवारी (23 सप्टेंबर) रात्री एक भयानक घटना घडली. रात्रीच्या अंधारात पुलावर पाणी साचले होते. या पाण्याचा अंदाज न आल्याने 23 प्रवाशांनी भरलेली बस थेट कसुरा नदीत कोसळली.
जालना : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे अनेक नद्या दुथळी भरुन वाहत आहेत. दरम्यान, जालना जिल्ह्यात गुरुवारी (23 सप्टेंबर) रात्री एक भयानक घटना घडली. रात्रीच्या अंधारात पुलावर पाणी साचले होते. या पाण्याचा अंदाज न आल्याने 23 प्रवाशांनी भरलेली बस थेट कसुरा नदीत कोसळली. पण स्थानिक गावकरी आणि प्रशासनाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. स्थानिक नागरीक आणि पोलिसांनी बसमधील सर्व प्रवाशांना सुखरुप वेळेत बाहेर काढले. त्यामुळे 23 प्रवाशांचा जीव वाचला.
नेमकं काय घडलं?
संबंधित घटना ही परतूर आष्टी रोजवर श्रीष्टी परिसरात घडली. पुलावरुन बस जात असताना पाण्याचा अंदाज न आल्याने बस थेट कसुरा नदीत कोसळली. विशेष म्हणजे याच नदीत दुपारी एक तरुण वाहून गेला होता. पण सुदैवाने त्याला पोहता येत असल्याने त्याचे प्राण वाचले होते. त्यानंतर रात्री याच पुलावरुन प्रवाशांनी भरलेली बस नदीत कोसळली. या दुर्घटनेत सर्व प्रवाशांचे प्राण वाचवण्यात प्रशासनाला यश आल्याची माहिती एपीआय शिवाजी नागवे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना दिली.
रात्र असल्याने बचाव कार्यात अडथळा
नदीत बस कोसळ्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. पुलाखाली बस कोसळल्याची बातमी वाऱ्यासारखी आजूबाजूच्या परिसरात पोहोचली. पोलीस, स्थानिक नागरीक तातडीने घटनासथळी दाखल झाले. पोलीस प्रशासन आणि स्थानिकांनी स्वत:चा जीव धोक्यात टाकून सर्व प्रवाशांना बसमधून बाहेर काढलं. विशेष म्हणजे रात्र असल्याने बचाव कार्यात अडथळा येत होता. पण स्थानिक आणि पोलिसांनी मोठ्या शर्तीने प्रयत्न करत सर्व प्रवासांना बाहेर काढले.
घटनेचा थरार बघा :
राज्यात पाच दिवसात कोणत्या जिल्ह्यात कधी व कसा पाऊस?
दिनांक 23 सप्टेंबरः परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
दिनांक 24 सप्टेंबर: परभणी, हिंगोली, लातूर व नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
दिनांक 25 सप्टेंबर: परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
दिनांक 26 सप्टेंबर: जालना, परभणी, नांदेड, लातूर व हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
दिनांक 27 सप्टेंबर: औरंगाबाद, जालना व लातूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे,
ही माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाचे मुख्य प्रकल्प समन्वयक डॉ. के.के, डाखोरे यांनी दिली आहे.
हेही वाचा :
वाढदिवशीच पेट्रोल टाकून जिवंत जाळले, धारुर घाटात अर्धवट जळालेला तरुण पाहून खळबळ, बीड हादरलं
100 महिला-मुलींना लग्नासाठी गंडवणारा अटकेत, पिंपरी चिंचवडच्या लखोबा लोखंडेचे चक्रावून टाकणारे प्रताप