Rajasthan Crime : आधी पत्नी आणि मुलाला17.30 तास ओलीस ठेवले, मग सीआरपीएफ जवानाने स्वत:वर गोळी झाडली
नरेश जाट हा राजस्थानातील पाली जिल्ह्यातील रहिवासी होता. जोधपूरच्या करवड पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या सीआरपीएफच्या प्रशिक्षण केंद्रात नरेश तैनात होता.
जोधपूर : पत्नी आणि मुलाला सुमारे 17.30 तास ओलीस (Hostage) ठेवून मग स्वतःवर गोळी झाडून सीआरपीएफ जवानाने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना जोधपूरमध्ये घडली आहे. नरेश जाट असे या जवानाचे नाव आहे. या घटनेमुळे सीआरपीएफ प्रशिक्षण केंद्रात खळबळ उडाली आहे. नरेशने कुटंबाला ओलीस ठेवत आपल्या क्वार्टरच्या बाल्कनीतून अधूनमधून गोळीबार (Firing) करत होता. नरेशने रविवारी सायंकाळी आपल्या क्वार्टरचा दरवाजा बंद केला होता. त्यानंतर त्याने बाल्कनीत येऊन मधूनमधून गोळीबार सुरू केला. त्याची समजूत काढण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले. त्यानंतर सोमवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास त्यांनी स्वत:वर गोळी झाडली. यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेने सीआरपीएफ आणि पोलीस-प्रशासनासह सर्वच लोकांना धक्का बसला. जोधपूर डीसीपी डॉ. अमृता दोहन यांच्या म्हणण्यानुसार, सीआरपीएफ प्रशासनाकडून त्याला काही कारणांमुळे त्रास होत असल्याचे सांगण्यात आले.
जोधपूरच्या प्रशिक्षण केंद्रात तैनात होता
नरेश जाट हा राजस्थानातील पाली जिल्ह्यातील रहिवासी होता. जोधपूरच्या करवड पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या सीआरपीएफच्या प्रशिक्षण केंद्रात नरेश तैनात होता. रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास त्याने पत्नी व 6 वर्षीय मुलगा यांना तेथे असलेल्या त्यांच्याच शासकीय निवासस्थानात कोंडून ठेवले होते. नंतर त्याने क्वार्टरच्या बाल्कनीत येऊन गोळीबार केला. घटनेची माहिती मिळताच सीआरपीएफचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण त्याने कुणाचेच ऐकले नाही आणि क्वार्टरचा दरवाजाही उघडला नाही.
जवानाकडून क्वार्टरमध्ये गोळीबार
रविवारी रात्री उशिरा जोधपूरचे पोलीस आयुक्त रविदत्त गौर, जोधपूरचे डीसीपी डॉ. अमृता दोहन आणि एसीपी राजेंद्र दिवाकर यांच्यासह अनेक उच्चपदस्थ अधिकारी तेथे पोहोचले आणि त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही नरेशचे वडील आणि मित्रांना बोलावून त्याला समजावून सांगितले. पण त्याने ऐकले नाही आणि जवळ आल्यास गोळ्या घालण्याची धमकी देऊ लागला. संध्याकाळी 6 ते दुपारी 2 वाजेपर्यंत नरेश याने सुमारे डझनभर गोळीबार केल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी त्याने क्वार्टरमध्ये 40 राउंड फायर केले होते.
आत्मसमर्पण करण्याची अट ठेवून आत्महत्या
सोमवारी सकाळपर्यंत त्याची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू होते, मात्र त्याने ऐकले नाही. सोमवारी सकाळी त्याने सीआरपीएफच्या आयजीसमोर आत्मसमर्पण करण्याची अट ठेवली होती, असे सांगण्यात येत आहे. यावर सीआरपीएफचे आयजी विक्रम सहगल जयपूरहून जोधपूरला पोहोचले. आयजीशी बोलल्यानंतर त्याने सकाळी 11.30 च्या सुमारास हनुवटीच्या खाली बंदुकीतून गोळीबार केला, ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. नरेशची पत्नी आणि मुलगा सुखरूप आहे. मात्र नरेशने असे का केले हे अद्याप कळू शकले नाही. (CRPF jawan commits suicide by holding wife and child hostage in Jodhpur)
756434