मॅट्रिमोनियल साईटवर 100 महिलांना गंडा, 25 कोटींची लूट, परदेशी नागरिकासह तिघे अटकेत
विवाहोच्छुक महिलांसोबत आरोपी ऑनलाईन मैत्री करायचे आणि त्यानंतर वेगवेगळ्या बहाण्याने त्यांच्याकडून पैसे उकळायचे. त्यानंतर अचानक बोलणे बंद करायचे, अशी त्यांची मोडस ऑपरेंडी होती
नवी दिल्ली : लग्नाच्या बहाण्याने जवळपास 100 हून अधिक महिलांची 25 कोटी रुपयांना फसवणूक करणाऱ्या परदेशी नागरिकाला दिल्लीच्या शाहदरा पोलिसांनी अटक केली आहे. मास्टरमाईंड व्यतिरिक्त पोलिसांनी त्याला साथ देणाऱ्या आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. तो मॅट्रिमोनियल वेबसाईटद्वारे महिलांशी संपर्क साधत असे.
काय आहे प्रकरण
विवाहोच्छुक महिलांसोबत आरोपी ऑनलाईन मैत्री करायचे आणि त्यानंतर वेगवेगळ्या बहाण्याने त्यांच्याकडून पैसे उकळायचे. त्यानंतर अचानक बोलणे बंद करायचे. काही दिवसांपूर्वी एका 35 वर्षीय महिलेने शाहदरा जिल्ह्यातील जगतपुरी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. काही दिवसांपूर्वी मनमीत नावाच्या तरुणाशी मॅट्रिमोनियल वेबसाईटद्वारे आपली ओळख झाल्याचं तिने तक्रारीत म्हटलं होतं.
मनमीत नावाने प्रोफाईल
हळूहळू दोघांमध्ये संभाषण सुरु झाले. मैत्री होताच गप्पा रंगू लागल्या. अचानक एक दिवस मनमीतने त्या महिलेला सांगितले की तो एका अडचणीत अडकला आहे, त्याची बँक खाती गोठवण्यात आली आहेत आणि त्याला पैशांची नितांत गरज आहे. हे ऐकून महिलेने मनमीतने सांगितलेल्या बँक खात्यात काही पैसे ट्रान्सफर केले.
यानंतर, काही ना काही बहाण्याने, आरोपीने महिलेकडून सुमारे 15 लाख रुपये घेतले. महिलेने तिचे सर्व सोन्याचे दागिने गहाण ठेवले आणि त्याला पैसे दिले. महिलेने पोलिसांना तक्रारीत सांगितले की, सर्व पैसे दिल्यानंतर त्या व्यक्तीने आपल्याशी संपर्क तोडला.
पुण्यात मॅट्रिमोनियल साईटवरुन फसवणूक
दुसरीकडे, प्रसिद्ध मॅट्रिमोनियल साईटवर आकर्षक प्रोफाईल बनवत देशभरातील विवाहोच्छुक तरुणींची फसवणूक करणाऱ्या भामट्याला अटक करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील निगडी पोलिसांनी प्रेमराज थेवराज डिकृज या आरोपीला अटक केली. तो मूळ तामिळनाडूतील चेन्नईचा रहिवासी असल्याची माहिती आहे.
काय आहे प्रकरण?
आरोपी प्रेमराज थेवराजने दोन-तीन महिने चिंचवडमधील एका उच्चशिक्षित तरुणीशी गप्पा मारुन ओळख वाढवली. तिचा विश्वास संपादन करत तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि लाखो रुपये उकळले. आपल्याला पैशांची गरज असल्याचं सांगून त्याने तिच्याकडे बारा लाख रुपयांची मागणी केली.
संबंधित बातम्या :
8 नवऱ्यांसोबत सप्तपदी, नवव्या लग्नासाठी सावजाचा शोध, ‘दरोडेखोर’ वधू निघाली एड्सग्रस्त
नवरी बारा वेळा बोहल्यावर चढली, बाराव्या ‘सासरी’ अशी अडकली नि पोलिसांनी ठोकल्या बेड्या