अपघात झालाय, हॉस्पिटलसाठी 20 हजार पाठव, भाजप नगरसेवकाच्या फेक फेसबुक आयडीवरुन फसवणूक
कांदिवलीच्या वॉर्ड क्रमांक 31 मधील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक कमलेश यादव यांच्या नावे एक बनावट फेसबुक अकाऊंट तयार करण्यात आले होते. अपघात झाल्याचे खोटे सांगून हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करायच्या बहाण्याने आरोपींनी यादव यांच्या मित्रांकडे पैशांची मागणी केली.
मुंबई : मुंबईत प्रसिद्ध व्यक्तींच्या फेसबुक अकाऊंट वरुन पैसे मागून फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. मुंबईमध्ये सक्रिय झालेली ही टोळी प्रसिद्ध व्यक्तींचे फेसबुक आयडी हॅक करते. त्यानंतर त्यांच्या नावाचा वापर करुन त्यांचे जवळचे मित्र किंवा त्यांच्या चाहत्यांकडून पैशाची मागणी केली जात असल्याचं समोर आलं आहे.
काय आहे प्रकरण?
कांदिवलीच्या वॉर्ड क्रमांक 31 मधील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक कमलेश यादव यांच्यासोबत असाच काहीसा प्रकार घडला. यादव यांनी सांगितले, की त्यांच्या नावे एक बनावट फेसबुक अकाऊंट तयार करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या जवळच्या मित्रांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली गेली. यादव यांच्या फेक फेसबुक अकाऊंटवर जेव्हा त्यांचे मित्र अॅड झाले, तेव्हा आरोपींनी कमलेश यादव यांचा फोटो वापरुन त्यांच्याशी चॅटिंग सुरु केलं. एके दिवशी अपघात झाल्याचे खोटे सांगून हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करायच्या बहाण्याने आरोपींनी मित्रांकडे पैशांची मागणी केली. मित्रांकडून तात्काळ दहा हजार किंवा 20 हजार रुपयांची मदत करण्याची मागणी केली गेली.
आणि असा झाला उलगडा
जेव्हा अपघाताबाबत मित्रांना समजले, तेव्हा त्यांच्या काही मित्रांनी त्यांना फोन करुन त्यांची विचारपूस केली. तेव्हा कमलेश यादव यांनी सांगितले की मी ठीक असून मला काहीच झाले नाही आहे. जेव्हा संपूर्ण प्रकार कमलेश यादव यांना समजला तेव्हा त्यांनी त्यांचं फेसबुक अकाऊंट बंद केलं आणि भविष्यामध्ये असं होऊ नये यासाठी लोकांना सावध राहण्याचा इशारा केला आहे.
पिंपरीत भाजप आमदाराच्या अकाऊंटवरुनही फसवणूक
दुसरीकडे, पिंपरी चिंचवडमधील भाजप आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Pandurang Jagtap) यांचं फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याचंही नुकतंच समोर आलं होतं. जगताप यांच्याही नावे सोशल मीडिया अकाऊण्टवरुन पैशांची मागणी केली जात होती. त्यामुळे आपल्या अकाऊण्टवरुन होणाऱ्या हॅकर्सच्या कोणत्याही मागण्यांना उत्तर देऊ नका, असं आवाहन लक्ष्मण जगताप यांनी केलं.
मिरा भाईंदरच्या आमदाराच्या नावे पैशांची मागणी
यापूर्वी, मिरा भाईंदर शहराच्या स्थानिक आमदार गीता जैन (Geeta Jain) यांच्या नावाने समाज माध्यमांवर बनावट खाते तयार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. गीता जैन यांच्या नावे बनावट व्हॉट्सअॅप अकाऊण्ट तयार करण्यात आले होते. या व्हॉट्सअॅप नंबरवर आमदार गीता जैन यांच्या नावासह फोटो जोडण्यात आला होता. फेसबुकचा आधार घेत शहरातील काही नागरिकांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअॅप करुन पैशांची मागणी करण्यात आली होती.
संबंधित बातम्या :
भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचं फेसबुक अकाऊंट हॅक, मित्रांकडे पैशांची मागणी
आमदार गीता जैन यांच्या नावे फेक WhatsApp नंबर, स्थानिकांकडे पैशांची मागणी
पार्थ पवार आणि लक्ष्मण जगतापांच्या भेटीने भुवया उंचावल्या
(Mumbai Cyber Crime Fake Facebook Profile of BJP Corporator Kamlesh Yadav)