सूटकेसमधील मृतदेहाचे गूढ टॅटूमुळे उकलले, तरुणाच्या हत्येप्रकरणी पत्नीसह सासूला अटक
7 ऑगस्टच्या रात्री नवीनची हत्या करण्यात आली होती. त्याचा मृतदेह तीन दिवसांनी नाल्यात सापडल्यामुळे तो कुजण्यास सुरुवात झाली होती. परंतु हत्येचे गूढ सोडवण्यास टॅटूने खूप मदत केली.
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत न्यू फ्रेंड्स कॉलनी पोलीस स्टेशन परिसरातील सुखदेव विहार नाल्यात 10 ऑगस्ट रोजी सापडलेल्या सूटकेसमधील मृतदेहाचे गूढ उकलण्यात दिल्ली पोलिसांना यश आले आहे. मृत तरुणाच्या उजव्या हातावर असलेल्या ‘नवीन’ नावाच्या टॅटूमुळे हत्येचे रहस्य उघड झाले आहे. हत्येप्रकरणी मयत तरुणाची पत्नी, तिचा मित्र आणि आईसह 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दक्षिण-पूर्व दिल्लीचे डीसीपी आरपी मीना यांनी दिलेल्या माहितीनुसार, 7 ऑगस्टच्या रात्री नवीनची हत्या करण्यात आली होती. त्याचा मृतदेह तीन दिवसांनी नाल्यात सापडल्यामुळे तो कुजण्यास सुरुवात झाली होती. परंतु हत्येचे गूढ सोडवण्यास टॅटूने खूप मदत केली.
काय आहे प्रकरण?
नवीन आणि आरोपी पत्नी मुस्कान यांचे चार वर्षांपूर्वी लग्न झाले होते, परंतु मुस्कान जवळपास गेल्या 7 महिन्यांपासून पतीपासून वेगळी राहत होती. 7 ऑगस्ट रोजी नवीन पत्नीला भेटण्यासाठी नेब सराई परिसरात आला होता. यावेळी जमाल नावाच्या तरुणाला मुस्कानच्या घरी पाहून तो चिडला. प्रकरण वाढल्याने त्याच रात्री मुस्कानने मित्र जमाल, आई आणि इतरांसह नवीनची चाकूने भोसकून हत्या केली. न्यू फ्रेंड्स कॉलनी परिसरातील नाल्यात फेकण्यापूर्वी मृतदेह धुवून सुटकेसमध्ये भरुन ठेवण्यात आला होता.
कॉल लोकेशनमुळे मित्रही अडकला
दरम्यानच्या काळात नवीनची पत्नी तिचं राहतं घर रिकामं करुन माहेरी गेली होती. सुरुवातीला मुस्कानने पोलिसांना तिच्या पतीच्या हातावरील टॅटूबद्दल सांगितलं नव्हतं, पण जेव्हा पोलिसांनी कसून चौकशी केली, तेव्हा संपूर्ण सत्य समोर आलं. याशिवाय दिल्ली पोलिसांना कॉल डिटेल्सवरून कळलं, की मुस्कान आपला मित्र जमालच्याही संपर्कात होती. त्याच वेळी, जमालच्या फोन लोकेशनचा वापर करून अधिक चौकशी केली असता, असं आढळून आलं, की तो केवळ 7 ऑगस्ट रोजी मुस्कानच्या घरी नव्हता तर मृतदेह फेकून देतानाही तो तिथे उपस्थित होता. यानंतर या सर्वांना अटक करण्यात आली आहे.
हत्येत वापरलेला चाकू, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वापरलेली रिक्षा, मृताचा मोबाईल, आरोपींचे 7 मोबाईल आणि त्यांचे रक्ताने माखलेले कपडे जप्त करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. सर्व आरोपींवर खून, मृतदेहाची विल्हेवाट लावणे आणि पुरावे नष्ट करणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या :