परस्त्रीशी नवऱ्याची मैत्री खटकायची, व्हिडीओ कॉल करुन वारंवार संशय, अखेर 16 वेळा भोसकून पत्नीची हत्या
आरोपी पतीची दुसऱ्या महिलेशी मैत्री होती, मात्र त्याला पत्नीचा विरोध होता. यामुळे पतीने सुपारी देऊन पत्नीला ठार मारल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार आहे.
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील मालवीय नगर पोलीस स्टेशन हद्दीतील शेख सराय भागात गुरुवारी संध्याकाळी झालेल्या 33 वर्षीय महिलेच्या हत्येप्रकरणी तिच्या पतीसह तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. पतीच्या सांगण्यावरून महिलेची हत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यासाठी पाच लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती. आरोपी पतीची दुसऱ्या महिलेशी मैत्री होती, मात्र त्याला पत्नीचा विरोध होता. यामुळे पतीने सुपारी देऊन पत्नीला ठार मारल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार आहे. मालवीय नगर पोलीस ठाणे त्याला शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
काय आहे प्रकरण?
दक्षिण दिल्लीच्या डीसीपी बेनिता मेरी जयकर यांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन कुमार गुलिया, राहुल आणि सोनू अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. 36 वर्षीय नवीन गुलिया हा मुख्य आरोपी आहे. 33 वर्षीय मृत महिलेचा तो पती आहे. शेख सराय फेज-2 च्या पॉकेट-केमध्ये राहणारा नवीन एका केबल ऑपरेटरकडे काम करतो. त्याच्या विरोधात यापूर्वी एक गुन्हाही आढळून आला आहे.
दोन काँट्रॅक्ट किलरही अटकेत
दुसरा आरोपी 22 वर्षीय राहुल हा गोविंदपुरी ट्रान्झिट कॅम्पचा रहिवासी आहे. व्यवसायाने तो ड्रायव्हरची नोकरी करतो. सध्या तो बेरोजगार आहे. त्याच्याही विरोधात गोविंदपुरी पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल आहे. तर तिसरा 19 वर्षीय आरोपी सोनू हा ओखला फेज-2 च्या मजूर कल्याण कॅम्पचा रहिवासी आहे. तो बाईक मेकॅनिक आहे. चंदू नावाचा त्यांचा आणखी एक साथीदार अद्याप फरार आहे.
मुख्य आरोपी पती नवीन गुलियाची स्कूटर ताब्यात घेण्यासोबतच पोलिसांनी त्याच्याकडून 50 हजार रुपये जप्त केले आहेत. ही रक्कम तो सुपारी किलरला देणार होता. यासोबतच एक कीपॅड मोबाईल फोन, हत्येत वापरलेला चाकू आणि एक दुचाकीही जप्त करण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी सांगितलं की, गोविंदपुरी येथे राहणाऱ्या एका महिलेशी सुमारे दीड वर्षांपासून नवीनची मैत्री होती. चार महिन्यांपूर्वी त्याच्या पत्नीला हा प्रकार कळला. त्यामुळे तिने दोघांच्या मैत्रीला कडकडून विरोध केला. ती नवीनचे लोकेशन जाणून घेण्यासाठी अनेक वेळा त्याला व्हिडिओ कॉलही करत असे.
चौकशीदरम्यान नवीनने सांगितले की, तो आणि त्याची मैत्रिणही यामुळे हैराण झाले होते. पत्नीपासून मुक्ती मिळवण्यासाठी त्याने ओळखीच्या तिघा जणांच्या मदतीने तिची हत्या घडवून आणली. राहत्या घरी चाकूने 16 ते 17 वेळा भोसकून तिची हत्या करण्यात आली. तिन्ही सुपारी किलर घराबाहेर पडताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजवरून मृत महिलेच्या पतीसह तिघांना अटक केली.
घरात नसल्याचा बनाव रचला
आरोपी पतीने असेही सांगितले की, प्लॅनिंगनुसार तो गुरुवारी आपल्या मुलाला घराबाहेर घेऊन गेला. आधी ते डॉक्टरकडे गेले. मग थोडी खरेदी केली आणि मग मुलाला न्हाव्याच्या दुकानात केस कापायला सोडले आणि तो ऑफिसला निघून गेला. तिथून त्याने फोनवरुन आपल्या एका कर्मचाऱ्याला मुलाला घरापर्यंत सोडण्यास सांगितले होते.
जेव्हा त्याचा कर्मचारी मुलाला घरी सोडण्यासाठी गेला, तेव्हा त्याला नवीनची पत्नी घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. त्यानंतर नवीनने पत्नीला रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी पत्नीला मृत घोषित करून पोलिसांना माहिती दिली.
संबंधित बातम्या :
नको तिथं डोकं! खिडकीतून घुसण्यासाठी चोराने तीन महिन्यात 10 किलो वजन घटवलं, 37 लाखांवर डल्ला
आधी मैत्रिणीची चाकूने वार करून हत्या, नंतर तिच्या घरात 21 वर्षीय तरुणाचा गळफास