नाशिककरांच्या सहनशीलतेचा अंत, मारेकऱ्यांना अटक करा म्हणत संतापलेले नागरिक रस्त्यावर!
भाजीपाला विक्रेता राजू शिंदे यांचा निर्घृण खून झाल्यानंतर शहरातील वातावरण तापले. मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा, अशी मागणी करत नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते.
नाशिकः नाशिकमध्ये सुरू असलेल्या खूनसत्रामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड दहशत आणि पोलिसांच्या हतबलतेविरोधात तीव्र संताप आहे. याचाच प्रत्यय बुधवारी आला. भाजीपाला विक्रेता राजू शिंदे यांचा निर्घृण खून झाल्यानंतर शहरातील वातावरण तापले. मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा, अशी मागणी करत मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते.
नेहमीच अतिशय शांत असणारे नाशिक या आठवड्यात घडलेल्या एकेका घटनांनी हादरून गेले आहे. अगदी कालच एका चार वर्षांच्या मुलीचे लॉकेट हिसकावण्याच्या प्रयत्नात चोराने तिच्यावर कट्यारीने हल्ला केला. या चिमुकलीवर अजूनही उपचार सुरू आहेत. त्यापूर्वी पोलीस पुत्राची झालेली हत्या आणि आता एका भाजीपाल्याचे दुकान चालवणाऱ्या तरुणाचा झालेला निर्घृण खून. यामुळे सामान्य नाशिकर हादरून गेला आहे. पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. मृत तरुण राजू शिंदे फुलेनगरातल्या भराड वाडी येथे राहायचा. रात्री साडेबाराच्या सुमारास तो घरी जात होता. यावेळी दबा धरून बसलेल्या अज्ञातांनी त्याला अडवले. त्याच्या डोक्यात दगड घालून त्याला संपवले. पोलिसांना याची खबर लागताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत मारेकरी पसार झाले होते. शिंदे यांचे भाजीपाला विक्रीचे छोटे दुकान होते. यावरचा त्याच्या कुटुंबाचा उर्दरनिर्वाह सुरू होता. वर्चस्ववादाच्या प्रकारातून हा खून झाल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे या आठवड्यात पोलीस पुत्राचा झालेला खूनही वर्चस्ववादातूनच झाल्याचे समोर आले. एकीकडे नाशिकमध्ये टोळी युद्ध, वर्चस्ववादातून खुनावर खून होतायत.
पोलीस काय करतायत?
शहरात खुनांमागे खून होतायत. मात्र, दुसरीकडे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी सध्या फक्त हेल्मेटसक्ती हा एकमेव विषय लावून धरलेला दिसतोय. त्यांनी आता गुन्हेगारांना वेसण घालण्यासाठी लक्ष घालावे. एकाच वेळी साऱ्या आघाड्यांवर लक्ष ठेवावे. लोकांचे जीवामागून जीव जात आहेत. नाशिकच्या प्रतिमेला धक्का बसतो आहे. हे टाळण्यासाठी शहरात शांतता प्रस्थापित करण्याची मागणी होत आहे.
जमाव रस्त्यावर
राजू शिंदे यांच्या हत्येनंतर मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर आले. आरोपींना तात्काळ बेड्या ठोका अशी मागणी त्यांनी केली. यावेळी उपस्थितांमध्ये तीव्र संताप होता. हे पाहता तात्काळ पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. त्यामुळे जमाव पांगला. मात्र, लोकांमध्ये तीव्र असंतोष आहे. शहरातील गुन्हेगारी घटन पोलिसांनी तात्काळ आटोक्यात आणाव्यात, अशी मागणी होताना दिसत आहे.
इतर बातम्याः
आधी Election सोसायट्यांचे; नाशिक जिल्ह्यातील 17 बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम रद्द