सोनसाखळी चोरटे दबा धरुन बसले, कचरा टाकण्यासाठी महिला घराबाहेर पडली आणि…
एक महिला कचरा टाकण्यासाठी घराबाहेर पडली होती. पण चोरट्यांनी दुचाकीवरुन येत तिच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून नेली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
धुळे : राज्यात सोनसाखळीच्या चोरीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाल्याचं बघायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी ठाण्यात सोनसाखळी चोरांमुळे एका महिलेचा रिक्षातून पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. या घटना ताज्या असतानाही अद्यापही सोनसाखळी चोरीच्या घटना घडताना दिसत आहेत. धुळ्यात अशीच एक सोनसाखळी चोरीची घटना घडली आहे. एक महिला कचरा टाकण्यासाठी घराबाहेर पडली होती. पण चोरट्यांनी दुचाकीवरुन येत तिच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून नेली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी धुळे पोलिसांनी दोन्ही सोनसाखळी चोरांना बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकं काय घडलं?
धुळे शहरातील साक्री रोड येथील कुंभारनगर येथे ताराबाई माधवराव कुंडल वास्तव्यास आहेत. ताराबाई काल (23 जुलै) कचरा फेकण्यासाठी घराबाहेर पडल्या. पण दोन सोनसाखळी चोरटे हे दबा धरुन बसले होते. त्यांनी ताराबाई रसत्यावर आल्याचं बघितलं. त्यानंतर ताराबाईच्या दिशेला वेगाने दुचाकी नेली. या दरम्यान मागे बसलेल्या नराधमाने ताराबाई यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचली. त्यानंतर दुचाकीचा वेग वाढवून आरोपी पळून गेले. यावेळी ताराबाई या जमिनीवर पडतापडता वाचल्या.
ताराबाईंची पोलीस ठाण्यात तक्रार
गळ्यातील सोनसाखळी चोरी झाल्याने ताराबाई यांना रडू कोसळले. त्यानंतर परिसरातील इतर नागरिकांनी त्यांची विचारपूस केली. काही नागरिकांनी ताराबाईंची समजूत काढत पोलिसात तक्रार देण्याची सूचना केली. त्यानंतर ताराबाई आपल्या नातेवाईकांसह पोलीस ठाण्यात गेल्या. पोलिसांनी तक्रारीची दखल घेऊन घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांनी परिसरात सीसीटीव्ही आहे का याचा तपास केला. त्यानंतर पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत अवघ्या 24 तासात चोरट्यांचा मुसक्या आवळल्या. तसेच त्यांच्याकडून 50 हजार किंमतीची चैन जप्त केली. पोलिसांच्या या कामगिरीचं आता कौतुक होऊ लागलं आहे.
आरोपींकडून गुन्हा कबूल
याप्रकरणी पोलिसांनी पकडलेल्या आरोपींचं नाव बाजीराव वाघ (वय 42), तसेच सनी रमेश चव्हाण (वय 19) असं आहे. दोघं आरोपी धुळ्याच्या साक्री रोड येथील फुले नगर परिसरात राहतात. पोलिसांनी त्यांना आधी संशयित म्हणून अटक केली. त्यांची कसून चौकशी केली असता आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला.
पोलिसांच्या या पथकाकडून कारवाई
संबंधित कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर पिंगळे आणि शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथक अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत पाटील, तसेच पोलीस कर्मचारी भिकाजी पाटील, मच्छिंद्र पाटील, योगेश चव्हाण,कमलेश सूर्यवंशी,निलेश पो्दार, राहुल गिरी, अविनाश कराड, प्रदीप ढिवरे, राहुल पाटील यांनी केली.
हेही वाचा :
नाशकात फ्री स्टाईल हाणामारी, सोसायटी अध्यक्ष-सचिवांनी महिलेला मारहाण केल्याचा आरोप
शिवसेना नगरसेवकाचा कोपरगाव नगर परिषदेत राडा, उपमुख्याधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप