मिरजेत नशेबाज तरुणांचा हैदोस सुरुच, ऑईल टँकरची काच फोडली, वाहकाला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
मिरजेत नशेबाज तरुणांचा हैदोस सुरुच आहे. दोन दिवसांपूर्वी मिरज रेल्वे स्थानकावर नशेबाजांनी एका तरुणाला कारण नसताना मारहाण केली होती. आता एका ऑईल टँकरच्या वाहकाला मारहाण केली आहे.
सांगली : मिरजेत नशेबाज तरुणांचा हैदोस सुरुच आहे. दोन दिवसांपूर्वी मिरज रेल्वे स्थानकावर नशेबाजांनी एका तरुणाला कारण नसताना मारहाण केली होती. ही घटना ताजी असताना आणखी एक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे मिरज गांधी चौकी हद्दीत आज (12 जुलै) सलग तिसऱ्या दिवशी नशेबाज तरुणांच्या लुटीचा प्रकार घडला आहे. त्यामुळे मिरजेतील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे पोलीस या प्रकरणाची दखल कधी घेणार? असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय.
नेमकं काय घडलं?
उत्तम नगर कॉर्नरला ऑईल वाहतूक करणारा टँकर उभा करून चालक बाहेर गेला. त्यानंतर दोन नशेबाज तरुणांनी टँकरमध्ये चढून साहित्य चोरन्याचा प्रयत्न केला. यावेळी टँकर वाहक साहिल शेख याने त्या तरुणाला पकडून जाब विचारला. पण चोरट्या तरुणांनी वाहकाचा चावा घेतला.
तरुणांच्या नातेवाईकांकडून वाहकाला मारहाण
हा सर्व प्रकार सुरू असताना त्या तरुणांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी येऊन टँकर वाहकाला मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे हा सर्व मारहाणीचा प्रकार घडत असताना त्या ठिकाणी वाहतूक शाखेचे पोलीस होते. पण त्यांनीही बघ्याची भूमिका घेतली. या मारहाणीत नशेबाज तरुणांनी हातावर आणि पाठीवर चावा घेतल्याने वाहक साहिल शेख जखमी झाला आहे.
मिरज रेल्वे स्थानकावरही नशेबाज तरुणांची दादागिरी
मिरज रेल्वे स्थानकावर नशेबाज तरुणांची प्रचंड दादागिरी सुरु आहे. त्यांचा हा मुजोरपणा आता कॅमेऱ्यातही कैद झाला आहे. दोन दिवसांपूर्वी काही नशेबाज तरुणांनी रेल्वे स्थानकावर आलेल्या एका तरुणाला लुटण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी ते त्याला त्रास देत होते. मुलाने त्यांना प्रतिकार केला तर त्यांनी तरुणाला मारहाण केली. हा सर्व प्रकार घटनास्थळी असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने मोबाईलमध्ये अचूकपणे कैद केला आहे. संबंधित व्हिडीओत नशेबाज तरुणाला अमानुषपणे मारहाण करताना स्पष्टपणे दिसत आहे.
जखमी तरुणाकडून पोलिसात तक्रार नाही
दरम्यान, संबंधित मारहाणीच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मिरज गांधी चौक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नशेबाज तरुणांना ताब्यात घेतलं. नशेबाजांनी तरुणाला इतकी मारहाण केली की पीडित तरुण हा जखमी झाला. मात्र, या तरुणाने अद्याप त्यांच्याविरोधात तक्रार दिली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. विशेष म्हणजे नशेबाजांनी पीडित तरुणाच्या डोक्यात दगड घालण्याचा प्रयत्न केला होता. तरीही जखमी तरुणाने त्यांच्याविरोधात तक्रार दिलेली नाही (Drunk youth beat oil tanker driver in miraj sangli).