घरातील महागड्या वस्तू, अंगावरील दागिने जशास तसे, तरीही वृद्ध महिला रक्ताच्या थारोळ्यात, आरोपींनी महिलेला का मारलं?
नागपुरात एका वृद्धेची तिच्या राहत्या घरात निघृणपणे हत्या करण्यात आलीय (Elderly woman murder in Nagpur).
नागपूर : नागपूर शहर पुन्हा एकदा हादरलं आहे. विशेष म्हणजे शुक्रावारी (14 मे) दिवसभरात हत्येच्या दोन घटना समोर आल्या आहेत. शहारातील महाल परिसरात सकाळी साडेदहा ते अकरा वाजेच्या सुमारास दोन आरोपींनी मिळून एका कुख्यात गुंडाची भर रस्त्यावर हत्या करण्यात आली. ही घटना ताजी असतानाच अवघ्या काही तासात आणखी एक हत्येची घटना समोर आलीय. एका वृद्धेची तिच्या राहत्या घरात निघृणपणे हत्या करण्यात आलीय. या हत्यामागील नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. विशेष म्हणजे महिलेच्या अंगावरील दागिने, घरातील महागडे वस्तू जसेच्या तसे असल्याने पोलीसही चक्रावून गेले आहेत. आरोपींनी 62 वर्षीय वृद्धेची हत्या नेमकी का केली असेल? याचा तपास पोलिसांकडून सध्या सुरु आहे (Elderly woman murder in Nagpur).
मृतक वृद्ध सेवानिवृत्त पोलीस
नागपूर शहरातील एसआपीएफ कॅम्प पाठीमागील सप्तक नगरात 62 वर्षीय वृद्धा वास्तव्यास होती. संबंधित परिसर हा एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत येतो. मृतक वृद्धेचं नाव विजयाबाई पांडुरंग तिवलकर असं होतं. त्या सेवानिवृत्त असून एकट्याच राहत होत्या. विजयाबाई या राज्य राखीव पोलीस दलातून निवृत्त झाल्या होत्या. त्यांचा एक मुलगा हा देखील एसआरपीएफमध्ये कार्यरत आहे. त्याची पोस्टिंग हिंगणा येथे आहे. मात्र मृतक विजया या मुलासोबत राहत नसून वेगळ्या राहायच्या. काल संध्याकाळी विजया या शेजारच्यांसोबत बोलल्या होत्या. मात्र आज सकाळपासून त्या घराबाहेर आल्याचं नाहीत. दुपारच्या वेळात त्यांच्याकडे काम करणारी महिला घरी आली असता त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आढळून आल्या (Elderly woman murder in Nagpur).
जेष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
घरकाम करणाऱ्या महिलेने या संदर्भात शेजारच्या लोकांना सूचना दिली. त्यानंतर एमआयडीसी पोलिसांना देखील माहिती कळवण्यात आली. घटनेची माहिती समजताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस सध्या खून होण्यामागील कारणांचा शोध घेत आहेत. मात्र या घटनेमुळे पुन्हा एकदा जेष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पोलिसांकडून तपास सुरु
पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला आहे. मृतक विजया यांचा गळा चिरण्यात आला असून डोक्यावर देखील जखमा आढळून आल्या आहेत. मृतक महिलेच्या घरातील महागड्या वस्तू आणि अंगावरील दागिने जश्याच तसे असल्याने चोरीच्या उद्देशाने त्यांचा खून झाला नसावा, असा कयास पोलिसांकडून लावला जात आहे.
नागपुरात कुख्यात गुंडाचीही हत्या
विजयाबाई पांडुरंग तिवलकर यांच्या खुनाची घटना समोर येण्यापूर्वी काही तासांच्या आधी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन आरोपींनी संगनमत करून एका कुख्यात गुंडाचा खून केला आहे. शानु उर्फ शहनवाज असे मृतकाचे नाव आहे. अवघ्या काही तासात दोन खुनाच्या घटना घडल्याने क्राईम कॅपिटल असलेलं नागपूर शहर पुन्हा हादरले आहे.
हेही वाचा : भर दिवसा रस्त्यावर थरार, दोन गुंड आमनेसामने, दोघांमध्ये संघर्ष, कुख्यात गुंडाची हत्या