Fake promotions|महसूल अधिकाऱ्यांच्या बनावट पदोन्नत्या; प्रती 41 कार्यालये, मंत्र्यांना पाठवल्याने खळबळ
महसूल खात्यातील या बनावट पदोन्नतीमागे खात्यातील काही अधिकारी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.
नाशिकः महसूल अधिकाऱ्यांच्या बनावट पदोन्नत्या झाल्याचे उघड झाले असून, विशेष म्हणजे हा आदेश सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यातही प्रशासनाच्या नावाची राज्यभर प्रचंड नाचक्की सुरू झाली आहे. याप्रकरणी काय कारवाई होणार, याकडे लक्ष लागले आहे.
घोळामागे घोळ
नाशिक जिल्ह्यातले दोन विभाग सध्या अती चर्चेत आहे. त्यातला एक म्हणजे कृषी आणि दुसरा महसूल. विशेष म्हणजे कृषीमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव तालुक्यातच अनुदान वाटपात घोटाळा करण्याचा प्रताप कृषी विभागातल्या प्रशासनाने केला. त्याची चौकशी आणि कारवाई अजून सुरू आहे. त्यातही रोज एक नवा प्रकार समोर येतोय. दुसरीकडे याच कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना कर्ज देण्याच्या नावाखाली लुबाडले आणि परस्पर पैसे हडप केले. हा प्रकार घडला पेठ तालुक्यात. इथे चक्क 147 शेतकऱ्यांना गंडा घालण्यात आला. त्यानंतर आता राज्यातील बहुचर्चित अशा महसूल विभागाचा घोळ उघड झाला आहे.
नेमके प्रकरण काय?
अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना भारतीय प्रशासकीय सेवेत समायोजित करून पदोन्नती व पदस्थापना देण्याबाबत, अशा मथळ्याखाली 6 जानेवारी रोजीच्या महसूल आणि वन विभागाच्या आदेशाने हे आदेश काढण्यात आले आहेत. या बनावट आदेशात अपर जिल्हाधिकारी रामदास खेडकर, उन्मेष महाजन, संकेत चव्हाण, मनीषा वाजे, व धनंजय निकम या पाच अधिकाऱ्यांची प्रशासकीय सेवेसाठी निवड झाल्याचे दाखवले आहे. समायोजित झाल्यानंतर त्यांची पदस्थापनाही त्यात दर्शवण्यात आली आहे. शासनाचे सहसचिव डॉ. माधव वीर यांच्या नावाने हे आदेश काढले असून, याच्या प्रती 41 शासकीय कार्यालये, अधिकारी, मंत्र्यांना पाठवण्यात आले आहेत. याप्रकरणी महसूल विभागाचे अवर सचिव अ. जे. शेट्ये यांनी गुन्हा दाखल केला आहे.
खात्यातील शुक्राचार्य
महसूल खात्यातील या बनावट पदोन्नतीमागे खात्यातील काही अधिकारी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. प्रशासनाने पोलिसात तक्रार दिली आहे. शिवाय तातडीने तपासही सुरू करण्यात आल्याचे समजते. मात्र, चक्क इतक्या बड्या अधिकाऱ्यांबाबत असे प्रकार होत असतील, तर प्रशासनामध्ये नेमके काय सुरू आहे, कोणाचा वचक आहे की नाही, असा सवाल विचारला जात आहे.
इतर बातम्याः
Nashik| सामाजिक कार्यकर्त्या, महिला हक्क संरक्षण समितीच्या माजी अध्यक्ष साधना तोरणे यांचे निधन
Video| पुन्हा अवकाळी तडाखा, शेतकऱ्यांना हुंदके अनावर; उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भाला इशारा
Nashik|नाशिक जिल्ह्यात 72935 नागरिकांना मिळणार हक्काचं घर, काय आहे योजना?