हिंगोलीत भर दिवसा गोळीबाराचा थरार, भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर जीवघेणा हल्ला
हिंगोलीत भर दिवसा गोळीबाराची घटना घडली आहे. विशेष म्हणजे हिंगोली जिल्हा परिषदेच्या आवारात संबंधित घटना घडली आहे. भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षांवर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय.
हिंगोली | 1 ऑगस्ट 2023 : हिंगोली जिल्हा आज गोळीबाराच्या घटनेमुळे हादरला. विशेष म्हणजे हिंगोली जिल्हा परिषदेच्या आवारातच हा गोळीबार झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. अज्ञात आरोपीने भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर गोळीबार केला. संबंधित गोळीबाराची घटना ही आज दुपारी तीन ते सव्वा तीन वाजेच्या सुमारास घडली. गोळीबाराच्या या घटनेमुळे जिल्हा परिषदेच्या आवारात एकच खळबळ उडाली.
अज्ञात आरोपीने तीन गोळ्या झाडल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी एक गोळी ही भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्या पाठीत लागली. या गोळीबाराच्या घटनेत पप्पू चव्हाण गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जवळील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले.
रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
दरम्यान, या घटनेची माहिती संपूर्ण जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली. पप्पू चव्हाण यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी संबंधित रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली. भाजपचे कार्यकर्ते, आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्यासह भाजपचे इतर पदाधिकारी रुग्णालयाबाहेर दाखल झाले होते.
दरम्यान, पप्पू चव्हाण यांच्यावर प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे रवाना करण्यात आले.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक अर्चना पाटील यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला. पोलीस आता या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज चेक करून आरोपीचा शोध घेत आहेत. चव्हाण हे काही कामानिमित्त जिल्हा परिषदेत आले असता ही घटना घडली. या घटनेमुळे हिंगोली शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.