घोडगाडीचा नाद अंगाशी आला, पोलिसांनी केली मोठी कारवाई, नेमकं काय घडलं ?
महामार्गावर घोडागाडीची शर्यत लावणे चौघांना चांगलेच महागात पडले आहे. प्राणी मित्र संघटनेच्या सतर्कतेमुळे चार घोड्यांची सुटका करण्यात आली.
मुंबई : वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर घोडागाडी शर्यत लावणे चांगलेच अंगाशी आले आहे. याप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. तसेच ज्या घोडागाडी शर्यत केली जात होती, तीही जप्त केली आहे. एका संस्थेच्या तक्रारीनंतर दिंडोशी पोलिसांनी ही कारवाई केली. दिंडोशी पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. रसल जर्सिटो, लॅरी जर्सिटो, भास्कर वैश, दिलीप प्रदीप डाकवा अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. समुद्रकिनारी पर्यटकांसाठी चालवल्या जाणाऱ्या घोडागाड्यांची शर्यत लावण्यात आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार प्राणी मित्र संघटनेने सापळा रचून पकडले
गोरेगाव पूर्व परिसरात घोडागाडी शर्यत होणार असल्याची माहिती प्राणी मित्र संरक्षण अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार प्राणी मित्र संघटनेचे भावेन गठानी, जय शहा, परमभावीन गठानी हे तिघे गोरेगाव-मुलुंड लिंक रोडवर थांबले होते. दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास गोरेगाव पूर्वेकडून पश्चिमेला येणाऱ्या पुलावरुन दोन घोडागाड्या धावताना त्यांना दिसल्या. घोडागाडील लोक घोड्यांना चाबकाने जोरात फटके देत पळवत होते. सुरक्षेची कोणतीही काळजी घेण्यात आली नव्हती.
सदर आरोपींकडे घोडागाडी चालवण्याचा परवानाही नव्हता
प्राणी मित्र संघटनेच्या सदस्यांनी त्यांना की हॉटेलजवळ थांबवले आणि त्यांच्याकडे परवानाबाबत विचारणा केली, मात्र त्यांच्याकडे परवाना नसल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर प्राणी मित्र संघटनेने तात्काळ दिंडोशी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत घोडागाडीसह चौघांना अटक केली. सध्या दिंडोशी पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.