20 वर्षांपासून करत होते लूट, 1000 चोऱ्या केल्या, अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या !
आरोपींकडून सुमारे 8 लाख 54000 रुपयांचा माल जप्त (Seized) करण्यात आला आहे. नाझीम आणि आबिद अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
गाझियाबाद : इंदिरापुरम पोलिसांच्या पथकाने घरे, फ्लॅट्स लुटणाऱ्या दोन आंतरराज्यीय टोळीतील दोघांना अटक (Arrest) केली आहे. चोरट्यांकडून चोरीचा माल विकत घेणाऱ्या सोनारा (Jeweller)ला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही टोळी गेल्या 20 वर्षांपासून चोऱ्या करत होती. या टोळीने आतापर्यंत 1000 हून अधिक घटना घडवल्या आहेत. आरोपींकडून सुमारे 8 लाख 54000 रुपयांचा माल जप्त (Seized) करण्यात आला आहे. नाझीम आणि आबिद अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
एका चोरी प्रकरणात आरोपी अडकले पोलिसांच्या जाळ्यात
नाझिम हा मेरठचा तर आबिद हा बुलंदशहरचा रहिवासी आहे. अलीकडेच या टोळीने दिल्लीतील कालकाजी येथील फ्लॅटमध्ये चोरी केली होती. चोरीच्या वेळी फ्लॅट मालक घरात आल्यावर चोरांनी मालकाला ओलीस ठेवले होते. पोलिसांनी आरोपीला वैशाली येथून अटक केली आहे.
पॉश भागात आधी रेकी करायचे मग टार्गेट हेरायचे
पोलिसांनी आरोपींकडून मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले आहेत. हे आरोपी दिल्ली एनसीआरच्या पॉश भागात आधी रेकी करायचे आणि बंद घरांना टार्गेट करायचे. चोरी केलेला माल फरिदाबादच्या ज्वेलर्सला विकायचे.
आरोपींनी दिल्ली, गाझियाबाद, मुझफ्फरनगर आणि नोएडा येथे मोठ्या चोऱ्या केल्या आहेत. या टोळीतील उर्वरित आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
गाझियाबादमध्ये अन्य एक चोरीची घटना उघड
गाझियाबाद पोलिसांनी अन्य एका घटनेत बंद घरांचे दरवाजे उचकटून चोरी करणाऱ्या चार बांगलादेशी चोरट्यांना अटक केली आहे. या टोळ्या दिल्ली एनसीआरमधील रेल्वे लाईनच्या आजूबाजूला असलेल्या कॉलनीत रेकी करत असत आणि मोठ्या चोरीच्या घटना घडवत असत.
या आरोपींनी गेल्या महिनाभरात बापूधाम, कविनगर, मसुरी आणि लोणी परिसरात 20 हून अधिक चोऱ्या केल्या होत्या.