वर्षभरापूर्वी इन्स्टाग्रामवर ओळख; ‘ती’ प्रेमाखातर पंजाबहून कोकणात आली खरी, पण…; अशी वेळ कुणावरही येऊ नये
सोशल मीडियावर झालेल्या प्रेमातून तरूणी पंजाबहून थेट रत्नागिरी दाखल झाली. पण तरुणी रत्नागिरीमध्ये येताच तिच्या प्रियकराचा फोन नॉट रिचेबल येऊ लागला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचं तरुणीला समजलं. यावेळी एका मोबाईल दुकानदाराच्या सतर्कतेमुळे तरूणी सुखरूप आपल्या घरी पंजाबला परतली आहे.
आपण सर्वजण सोशल मीडियाचा वापर करतो. या सोशल मीडियाचा आपल्याला फायदादेखील होतो. सोशय मीडियामुळे सर्वसामान्य, गरीब कुटुंबातील मुलं पुढे जावून खूप यशस्वी झाले. तसेच या सोशल मीडियामुळे जग अतिशय जवळ आलं. याशिवाय सोशल मीडियामुळे अनेकांना लहानपणाची मित्र-मैत्रिणींची पुन्हा भेट झाली. पण असं असलं तरी काही गोष्टींचा वापर हा एका विशिष्ट मर्यादेपर्यंत करायला हवा. अन्यथा त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात. विशेष म्हणजे सोशल मीडियाचा वापर करताना आपण सतर्क असायला हवं, अन्यथा याच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली फसवणूक होऊ शकते. रत्नागिरीत असाच एक प्रकार समोर आला आहे. एक तरुणी आपल्या प्रियकरासाठी थेट पंजाबहून रत्नागिरीत आली. पण इथे आल्यावर तो तरुण तिला भेटलाच नाही. याशिवाय तिने त्याचा फोनदेखील उचलला नाही. अखेर एका मोबाईल दुकानदाराचया सतर्कतेमुळे संबंधित तरुणी ही सुखरुप पंजाबला आपल्या घरी परतली आहे.
नेमकं काय घडलं?
वर्षभरापूर्वी इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर झालेल्या प्रेमातून पंजाबमधील तरूणीनं थेट रत्नागिरी गाठली. पण, रत्नागिरीमध्ये येताच आपली फसवणूक झाल्याची बाब या तरूणीच्या लक्षात आली. दोनच दिवसांपूर्वी झालेला संपूर्ण प्रकार तरूणीनं प्रसारमाध्यामांसमोर येत उघड केला आहे. कारण, पंजाबहून रत्नागिरीला आलेली तरूणी संबंधित तरूणाला रत्नागिरी रेल्वे स्थानकावर उतरून फोन करत होती. सोशल मीडियावर त्याला मेसेज करत होती. पण, रिप्लाय मिळत नव्हता. शिवाय, उचलला गेलेला फोन कुणा भलत्याच तरूणीनं उचलल्याचा दावा देखील या तरूणीनं केला आहे.
आपली फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर कुठंतरी नोकरी शोधून पैसे कमवायचे आणि घरी परत जायचं या इराद्यानं तरूणीनं नोकरीचा शोध सुरू केला. पण, त्याचवेळी मोबाईल दुकानातील दुकानदारानं या तरूणीची विचारपूस केली. त्यानंतर सर्व प्रकार समोर आला. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी तरूणीच्या कुटुंबियांशी संपर्क केला. दरम्यान, तरूणी तिच्या पंजाबमधील मोहाली येथील गावी परतली आहे. तर, तिला फसवणाऱ्या तरूणाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संबंधित आरोपीचा शोध देखील सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.