मैत्रिणींसोबत होळी खेळण्यासाठी गेली पण घरी परतलीच नाही, शोधाशोध सुरु झाला अन्
होळीच्या दिवशी एका गावात दुखाची लाट पसरली आहे. नववीत शिकणारी तरुणी आपल्या मैत्रिणींसोबत होळी खेळण्यासाठी घराबाहेर पडली, पण रात्र होऊन गेली तरी ती घरी परतली नाही. त्यानंतर शोधाशोध सुरु झाला.
रांची : गोड्डा जिल्ह्यात होळीच्या दिवशी एका कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळलाय. मित्रांसोबत होळी खेळण्यासाठी गेलेल्या तरुणीचा मृतदेह आढळल्याने सगळीकडे खळबळ उडाली. गोविंदपूर गावातील एका शेतात नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा मृतदेह सापडला. पोलिसांनी मृताच्या वडिलांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
तरुणीच्या वडिलांनी सांगितले की, त्यांची मुलगी होळीच्या दिवशी संध्याकाळी रंग खेळण्यासाठी मैत्रिणीच्या घरी जात असल्याचे सांगून घरातून निघाली होती. मात्र रात्री ती घरी न परतल्याने तिचा शोध सुरु केला. मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो स्वीच ऑफ होता. यानंतर घटनेची माहिती महागमा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी रात्रभर शोधही घेतला, मात्र मुलगी सापडली नाही. गुरुवारी सकाळी गोविंदपूर टेकडीजवळ एका मुलीचा मृतदेह असल्याची माहिती कोणीतरी दिली. त्यानंतर पोलिसांसह आलेल्या कुटुंबीयांनी मृतदेहाची ओळख पटवली.
16 वर्षाच्या मुलीची हत्या
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला. मृत तरुणीचे वडील ईस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या राजमहल प्रकल्पात डंपर ऑपरेटर म्हणून नोकरी करतात. मयताच्या शरीरावर जखमांच्या खुणा आहेत त्यामुळे तिची हत्या झाल्याची शंका आहे.