14 देशांचा जावई, वयाच्या 32 व्या वर्षापासून लग्न करत सुटला, बायका इतक्या की लक्षात ठेवणं अवघड; गिनीज बुकात नोंद
एक दोन नव्हे तर 100 महिलांशी विवाह करणाऱ्या एका लखोबा लोखंडेला पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे त्याने एकाही पत्नीशी घटस्फोट न घेता इतके विवाह केले आहेत. गिनीज बुकात त्याची नोंद झाली आहे.
न्यूयॉर्क : जगभरात अनेक प्रकारचे रेकॉर्ड होतात आणि तुटतातही. यापुढेही रेकॉर्ड होत राहतील. यातील काही रेकॉर्ड तर चित्रविचत्रं आहेत. काहींनी नखेच वाढवण्याचं रेकॉर्ड केलाय. तर कुणी दाढीच वाढवण्याचा रेकॉर्ड केलाय. तर कोण वजन वाढवण्यात मश्गूल आहे तर आणखी कोण कशात व्यस्त आहे. पण एका व्यक्तीने तर चक्क सर्वाधिक विवाह करण्याचा रेकॉर्ड करून सर्वांनाच आश्चर्यचकीत करून सोडलं आहे.
या पठ्ठ्याने 100 हून अधिक महिलांशी लग्न करण्याचा रेकॉर्ड केला आहे. वयाच्या 32 व्या वर्षापासून तो लग्न करतच सुटला होता. 1949 ते 1981च्या दरम्यान त्याने हे विवाह केले आहेत. विशेष म्हणजे त्याने घटस्फोट न घेता हे लग्न केले आहेत. त्यामुळेच जगातील सर्वाधिक तीन आकडी विवाह करण्याचा रेकॉर्ड त्याने आपल्या नावे केला आहे. द्विविवाह करणारा तो जगातील एकमेव पुरुष ठरला आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने त्याचा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्यात जियोवन्नी विगलियोटोची कहाणी सांगण्यात आली आहे.
खरं नाव माहीतच नाही
100हून अधिक महिलांशी विवाह करणाऱ्या या पठ्ठ्याचं नाव जियोविन्नी विगलियोटो असं आहे. तेच त्याचं असली नाव असावं असं सांगितलं जात आहे. शेवटचा विवाह करतानाही त्याने त्याचं हेच नाव सांगितलं होतं. त्यामुळे हेच त्याचं खरं नाव असावं असं सांगितलं जातं. वयाच्या 53व्या वर्षी त्याला पकडण्यात आलं होतं. त्यानंतर त्याने पोलिसांना माहिती दिली ती रंजक होती. त्याचा जन्म इटलीच्या सिसिलीमध्ये 3 एप्रिल 1929 रोजी झाला होता. त्यावेळी त्याने त्याचं असली नाव निकोलई पेरुस्कोव असं सांगितलं होतं. नंतर वकिलाने त्यांचं खरं नाव फ्रेड जिप असल्याचं सांगितलं होतं. तसेच त्याचा जन्म 3 एप्रिल 1936 मध्ये न्यूयॉर्कला झाल्याचं सांगितलं होतं.
To this day, nobody is sure of the real name of ‘Giovanni Vigliotto’ – the man who conned women and got married over 100 times. pic.twitter.com/MVFujTws5o
— Guinness World Records (@GWR) April 5, 2023
पहिल्याच डेटवर प्रपोज करायचा
विगलियोटोने 1949 ते 1981 दरम्यान 104 ते 105 महिलांसोबत लग्न केलं होतं. त्याची कोणतीच बायको एकमेकींना ओळखत नाही. एवढंच कशाला त्याच्या कोणत्याच बायकोला त्याच्या बद्दलची सर्वकाही माहिती नाही. त्याने अमेरिकेच्या 27 वेगवेगळ्या राज्यात आणि 14 देशात लग्न केलं. खोटी ओळख बनवून तो असं करायचा असं सांगितलं जातं. तो सर्व महिलांना चोर बाजारात भेटायचा. तसेच पहिल्या डेटला त्यांना प्रपोज करायचा. त्यानंतर लग्न झालं की बायकोचं सामान, किंमती वस्तू, दागिने आणि पैसे घेऊन फरार व्हायचा. मी खूप लांब राहत आहे. त्यामुळे तू सर्व सामान घेऊन माझ्याकडे ये, असं तो बायकोला सांगायचा, असं गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या साईटवर नमूद आहे.
चोरीचं सामान घेऊन पसार व्हायचा
त्याचं ऐकून या महिला आपलं सामान पॅक करायच्या. त्यानंतर विगलियोटो हे ट्रकभरून सामान घेऊन लंपास व्हायचा. त्यानंतर तो कधीच दिसायचा नाही. तो सर्व चोरीचं सामान चोर बाजारात विकायचा. तिथेच तो पुन्हा दुसऱ्या महिलेला जाळ्यात फासायचा. त्याच्याविरोधात अनेक तक्रारी आल्या. पण तरीही पोलिसांना गुंगारा देऊन तो पसार होण्यात यशस्वी ठरायचा. जी शेवटची महिला त्याच्या जाळ्यात सापडली होती, तिने त्याला फ्लोरिडामध्ये पकडलं. या महिलेचं नाव शारोन क्लार्क असं आहे. ही महिला इंडियानाच्या चोर बाजारात मॅनेजर म्हणून काम करायची.
34 वर्षाची शिक्षा
विगलियोटोला 28 डिसेंबर 1981मध्ये पकडलं होतं. त्यानंतर जानेवारी 1983 मध्ये त्याच्याविरोधात खटला सुरू झाला. त्याला एकूण 34 वर्षाची शिक्षा सुनावली. त्यात त्याला 28 वर्षाची फसवणूक केल्याप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली. तर एकाहून अधिक विवाह केल्याप्रकरणी त्याला सहा वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच त्याला 336,000 डॉलरचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्याने आपल्या आयुष्याचे शेवटचे 8 वर्ष एरिजोना स्टेटच्या तुरुंगात घालवले. वयाच्या 61 व्या वर्षी ब्रेन हॅमरेज झाल्याने 1991 त्याचा मृत्यू झाला.