लातूरात सव्वाकोटींचा गुटखा जप्त, सलग दोन दिवस धाडसत्र, गुटखा किंगचे धाबे दणाणले
गंजगोलाईतील प्रेम एजन्सीच्या नावे असलेल्या एका दुकानावर आणि त्याने भाडे तत्त्वावर घेतलेल्या विविध गोदामांवर पोलिसांनी धाडी टाकल्या. ही कारवाई सलग दोन दिवस चालली.
लातूर: लातूरमधील गंजगोलाई परिसरातील एका दुकानावर टाकलेल्या छाप्यात सव्वा कोटी रुपयांचा गुटखा आणि सुगंधित तंबाखूचा साठा जप्त (Latur crime) करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून लातूर शहरासह जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चोरट्या मार्गाने गुटखा विक्री आणि साठा सुरु आहे. यातील गुटखा किंगला लातूरच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांनी चांगलाच दणका दिला आहे. या धाडीत मोठ्या प्रमाणावर गुटखा आणि तंबाखू जप्त करण्यात आली.
शनिवार व रविवारी मोठे धाडसत्र
सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या पथकाकडून लातूर शहरातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात येत आहे. गंजगोलाईतील एका दुकानात गुटखा आणि सुगंधित तंबाखूची विक्री होत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यानुसार, त्यांनी प्रेम एजन्सी या दुकानावर छापा टाकला. तसेच शहरातील विविध गोदामांचीही तपासणी केली. यात सव्वा कोटी रुपयांचा गुटखा आणि सुगंधित तंबाखूचा साठा सापडला.
अनेक गोदामांवर धाडी
गंजगोलाईतील प्रेम एजन्सीच्या नावे असलेल्या एका दुकानावर आणि त्याने भाडे तत्त्वावर घेतलेल्या विविध गोदामांवर पोलिसांनी धाडी टाकल्या. ही कारवाई सलग दोन दिवस चालली. यात हाती लागलेल्या गुटख्याची मोजदाद केल्यानंतर तो तब्बल 1 कोटी 25 लाख रुपयांचा असल्याचे समोर आले.
गुटखा किंगचा आरोपींचा शोध सुरू
प्रेम एजन्सीचा मालक प्रेमनाथ तुकाराम मोरे व त्याचा सहकारी शिवाजी मोहिते सावकार याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या प्रकरणातील आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेने लातुरमधील गुटखा किंगचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. आतापर्यंतच्या कारवाईत ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे.
कर्नाटकमधून आला गुटखा
महाराष्ट्र कर्नाटक राज्याच्या सीमेवरील लातूर जिल्ह्यात कर्नाटकातून मोठ्या प्रमाणावर अवैध गुटख्याची वाहतूक होत असल्याचे उघडकीस आले आहे. राज्याची सीमा भेदून हा गुटखा निलंगा, उदगीर, अहमदपूर लातूर जुल्ह्यात विक्रीसाठी आणला जातो. हा गुटखा काही दुकानदारांना वितरीत केला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
इतर बातम्या
वाईन शॉपीवर दारु खरेदी करताना चाकूहल्ला, औरंगाबादमध्ये तरुणाचा मृत्यू