बाप रे ! गुजरातमध्ये 9 हजार कोटीची हेरोईन जप्त, जगातली आतापर्यंतची सर्वात मोठी तस्करी उघड, अफगाण कनेक्शन
गुजरातमध्ये डीआरआयला जी हेरोईन सापडलीय ती जवळपास 9 हजार कोटी रुपये किंमतीची असल्याची माहिती पुढं आलीय. ह्या छाप्यानंतर दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद, गांधीधाम, मांडवी इथं छापे टाकून चौकशी केली जातेय. आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आलीय आणि काही अफगाण नागरीकांचा शोध सुरु असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
महाराष्ट्रासह देशभरात गणेश विसर्जनाची धूम असतानाच एक बातमी गुजरातमधून आलीय. आणि ही बातमी तिथल्या सत्ताबदलानंतरच्या परिणामांची नाहीय. तर ही बातमी आहे आतापर्यंतच्या फक्त जगातल्या सर्वात मोठ्या तस्करीच्या जप्तीची. एक नाही दोन नाही तर तब्बल 9 हजार कोटी रुपयांची हेरोईन जप्त करण्यात आलंय. कच्छच्या मुंद्रा बंदरावर डीआरआयनं(DRI-Directorate of Revenue Intelligence) झडती घेतली त्यात ही हेरोईन सापडलीय. आतापर्यंत दोन जणांना अटक करण्यात आलीय तर काही अफगाण नागरीकांचाही शोध घेतला जातोय, ज्यांचं ह्या जप्त केलेल्या हेरोईनशी संबंध आहे.
हेरोईनचा सुगावा कसा लागला? आंध्र प्रदेशातल्या विजयवाड्यात आशी ट्रेडींग नावाची कंपनी आहे. ह्या कंपनीनं अफगाणिस्तानमधून काही बाबी इम्पोर्ट केल्याची टीप डीआरआयला लागली. त्यातही यात ड्रग्ज असल्याचं टीप देणाऱ्यानं सांगितलं होतं. त्याच टीपच्या आधारावर मुंद्रा बंदरात आलेल्या दोन कंटेनरची झडती अधिकाऱ्यांनी घेतली. अधिकाऱ्यांना कंटेनरमध्ये ड्रग्जसारखी पावडर मिळाली. त्यांनी अधिक चौकशी केली असता, ती पावडर टॅलकम पावडर असल्याचं सांगितलं गेलं. घटनास्थळावर गांधीनगरचे फॉरेन्सिक एक्स्पर्ट हजर होते. त्यांनी ती पावडर तपासली आणि त्यात हेरोईन असल्याची खात्री केली. अगदी तंतोतंत सांगायचं तर पहिल्या कंटेनरमध्ये 1999.58 किलो ग्राम हेरोईन होती तर दुसऱ्या कंटेनरमध्ये 988.64 किलो ग्राम म्हणजेच 2 हजार 988.22 किलो ग्राम एवढी हेरोईन जप्त करण्यात आलीय. हे कंटेनर अफगाणिस्तानमधून जरी आले असले तरीसुद्धा ते इराणच्या बंदर अब्बास पोर्टमधून आलेले आहेत.
हेरोईन सापडली पुढे काय? गुजरातमध्ये डीआरआयला जी हेरोईन सापडलीय ती जवळपास 9 हजार कोटी रुपये किंमतीची असल्याची माहिती पुढं आलीय. ह्या छाप्यानंतर दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद, गांधीधाम, मांडवी इथं छापे टाकून चौकशी केली जातेय. आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आलीय आणि काही अफगाण नागरीकांचा शोध सुरु असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. अधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार- ही जगातली आतापर्यंतची जप्त केलेली सर्वात मोठी हेरोईनची खेप आहे.
नवी मुंबईत काय घडलं होतं? अडीच महिन्यापुर्वीच म्हणजेच जुलै महिन्यात नवी मुंबईतल्या न्हावा शेवा बंदरात 300 किलो ग्राम हेरोईन जप्त करण्यात आली होती. त्यावेळेसही कंटेनरमध्येच हेरोईन होती. आणि विशेष म्हणजे ते कंटेनरसुद्धा इराणच्या बंदर अब्बास पोर्टमधूनच आलेले होते. त्यावेळेसही टॅलकम पावडरच असल्याचं सांगितलं गेलं होतं.
पाकिस्तान ते नवी मुंबई त्यानंतर ऑगस्ट महिन्यात न्हावा शेवा बंदरातच 191 किलो ग्राम हेरोईन डीआरआयनं जप्त केली होती. त्यात तिघांना अटक केली गेली होती. त्यात सुरेश भाटिया, मोहम्मद नौमन आणि महेंद्र निगम अशी त्यांची नावं होती. सोबतच कस्टमचेच हाऊस एजंट असलेल्या मीनानाथ बोडके आणि कोंडीभाऊ गुंजाळ यांनाही अटक केली गेली. हेरोईनची ही खेप मात्र पाकिस्तानमधून आलेली होती आणि इराणच्या छाबार बंदरातून तिला पाठवलं गेलं होतं.
ऑगस्टमध्येही तस्करांनी शक्कल लढवली होती. कंटेनरमध्ये आयुर्वेदीक प्रोडक्ट असल्याचं सांगितलं. एवढच नाही तर प्लॅस्टिक पाईपला तंतोतंत बांबूसारखं रंगवून त्यात हेरोईन आणली गेली होती. ज्या कंपनीनं ही खेप इम्पोर्ट केली होती, तिचं नाव आहे सर्वीम एक्सपोर्ट आणि तिचा पत्ता डेरावल नगर दिल्ली असल्याचं उघड झालं.
संबंधित बातम्या :
NCB ची नवी मुंबईत मोठी कारवाई, आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कराला अटक
नागपुरात ड्रग्ज तस्करांनी हातपाय पसरले; एकाला अटक करून 5 किलो गांजा जप्त
ड्रग्जच्या तस्करीसाठी कॉल सेंटर मॉड्युलचा वापर; मुंबईत आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश