पिंपरीत पुन्हा एकदा गोळीबाराची घटना, भररस्त्यात तरुणावर गोळीबार
पुण्यात गुन्हेगारी थांबण्याचे नावच घेत नाही. दिवसाढवळ्या भरदिवसा गुन्हे घडत आहे. गुन्हेगारांना कायद्याचा धकच उरलेला दिसत नाही.
पिंपरी : तळेगाव दाभाडे येथे जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. यानंतर पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने पिंपरी-चिंचवड हादरले आहे. चिंचवड शहरात भर दिवसा एकावर गोळीबार करण्यात आला आहे. सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास दोन अज्ञात आरोपींनी चिखली चौकात उभ्या असलेल्या तरुणावर गोळ्या झाडल्या. सोन्या तापकीर असे गोळ्या झाडण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेत तो गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पूर्ववैमनस्यातून हा गोळीबार झाल्याची माहिती मिळते.
कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची 12 मे रोजी तळेगाव दाभाडे येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येला दहा दिवस उलटत नाही तोच आज पुन्हा गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गोळीबारात तरुण गंभीर जखमी
पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली चौकात सोन्या तापकीर उभा होता. यावेळी दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात सोन्या गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर आरोपी फरार झाले आहेत. या घटनेप्रकरणी चिखली पोलीस अधिक तपास करत असून, आरोपींचाही शोध घेत आहेत.