रात्री 2 ते पहाटे 6 वाजे दरम्यान चोरी करायचा, एक चूक भोवली अन् पकडला; ‘बिग बॉस’मध्ये गेलेला ‘इंडियाचा सुपर चोर’ अखेर जेरबंद
इंडियाचा सुपर चोर म्हणून कुविख्यात असलेल्या बंटीला अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी 500 किलोमीटरपर्यंत त्याचा पाठलाग करून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. 500 हून अधिक चोऱ्या केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
नवी दिल्ली : इंडियाचा सुपर चोर बंटी ऊर्फ देवेंद्र याला अटक करण्यात आली आहे. दिल्लीच्या साऊत डिस्ट्रिक पोलिसांनी बंटीचा 500 किलोमीटरपर्यंत पाठलाग करत कानपूर येथे अटक केली. ग्रेटर कैलाशमध्ये नुकत्याच दोन चोऱ्या झाल्या होत्या. त्यात बंटीचं नवा आलं होतं. विशेष म्हणजे इंडियाचा सुपर चोर समजल्या जाणाऱ्या बंटीवर सिनेमा बनलेला आहे. तो बिग बॉसमध्येही जाऊन आलेला आहे. त्यावर देशभरात 500 हून अधिक चोरी केल्याचा आरोप आहे. अनेक प्रकरणात तर त्याला शिक्षाही सुनावलेली आहे.
2010मध्ये बंटी तीन वर्षाची शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेर आला होता. त्यावेळी त्याने चांगलं वागण्याची शपथ घेतली होती. त्यानंतर तो बिग बॉसमध्येही गेला होता. मात्र, वर्षभरापूर्वी झालेल्या चोरीच्या एका घटनेचा तपास करताना सीसीटीव्हीमध्ये तो दिसून आला. त्यामुळे तो पुन्हा चोऱ्या करत असल्याचं उघड झालं. केरळची राजधानी तिरुअनंतपूरममध्ये एनआरआय उद्योजकांच्या घरात चोरी केल्याप्रकरणी त्याला 10 वर्षाची शिक्षा झालेली आहे. ही चोरी 2013मध्ये झाली होती. त्याने या उद्योजकाच्या घरातून 28 लाख रुपयांची एसयूव्ही कार, लॅपटॉप आणि दोन मोबाईल चोरले होते. या हायटेक चोरीनंतर पोलिसांनी त्याला पुण्यातून अटक केली होती.
सिनेमाही बनला
सुपर चोर बंटी खास पॅटर्ननुसार चोरी करायचा. त्याच्यावर Oye lucky OYE नावाचा सिनेमाही बनलेला आहे. या सिनेमात बंटीची व्यक्तीरेखा अभय देओलने साकारली होती. खोसला का घोसला सारखा हिट सिनेमा करणारे सिनेनिर्माते दिबाकर बॅनर्जी यांनी ही सिनेमा तयार केला होता.
अन् चोरी पकडली
एका छोट्या चुकीमुळे त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. 12 एप्रिल रोजी रात्री बंटीने दिल्लीच्या जीके 2 एम ब्लॉक येथील एका घरात चोरी केली. पोलिसांना 13 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता माहिती मिळाली. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे पाहिले असता त्यात बंटी कारमध्ये बसताना दिसला. पोलिसांनी या कारचा शोध लावला. या दरम्यान आणखी एक चोरी झाल्याचं पोलिसांना कळलं. त्याच रात्री बंटीने बलेनों कारमधून ग्रेट कैलाश येथील एसबीआयच्या गेस्ट हाऊसमध्ये चोरी केली होती. येथून त्याने एलईडी टीव्ही आणि लॅपटॉपसह तीन मोबाईल चोरले होते.
बंटीने तीन मोबाईल चोरले. पण त्यातील एक मोबाईल स्विच्ड ऑफ करायला विसरला. त्यामुळेच तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पोलिसांनी मोबाईलचं लोकेशन ट्रेस करत त्याच्या कारचा पाठलाग केला. अन् बंटीच्या मुसक्या आवळल्या.
चोरीचा खास पॅटर्न
1. बंटी सर्व चोऱ्या मध्यरात्री 2 वाजता ते पहाटे 6 वाजेदरम्यान करायचा
2. घरात जाण्यासाठी तो दरवाजा किंवा खिडकीची ग्रिल एका लांब पेचकसने खोलायचा. त्याशिवाय त्याने कधीच कोणत्या हत्याचारा वापर केला नाही.
3. तो नेहमी लग्झरी कार, ज्वेलरी, कटलरी, परदेशी घड्याळं आणि अँटिक फर्निचरवर हात साफ करायचा. चोरी करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये कधीच कोणती किरकोळ वस्तू नसायची.
4. कारमधील सामान चोरी करताना त्याने आतापर्यंत कधीच कारचा लॉक तोडला नाही. कार उघडण्यासाठी तो नेहमीच कार मालकाच्या घरातून चोरलेल्या चावीचा वापर करायचा
5. सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे तो चोरी करण्यासाठी कारमध्ये बसूनच यायचा. जुनी कार घटनास्थळी सोडून तो नवी कार घेऊनच फरार व्हायचा.