सासऱ्याने प्रेमविवाह केला, जात पंचायतीची सुनेला शिक्षा, तब्बल सात पिढ्यांवर बहिष्कार, आता…
Cirme News: जात पंचायतीच्या निर्णयाविरोधात अखेर याप्रकरणी बीडच्या आष्टी पोलीस ठाण्यात नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सामाजिक बहिष्कार अधिनियमानुसार आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
विविध समाजातील जात पंचायतीकडून होणाऱ्या सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तींचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्रात कायदा झाला. अधिनियम – २०१६ या पद्धतीचे कायदा करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले होते. त्यानंतर राज्यातील अनेक भागांत जात पंचायतींचे वर्चस्व सुरु आहे. आता बीड जिल्ह्यातून जात पंचायतीचा अजब फतवा समोर आला आहे. सासऱ्याने प्रेमविवाह केला, त्याची शिक्षा सुनेला देण्यात आली आहे. सासऱ्याने प्रेमविवाह केल्यामुळे जात पंचायतीने सुनेला शिक्षा देत सात पिढ्या समाजातून बहिष्कृत केल्या आहेत. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला. पण अखेर महिलेच्या तक्रारीवरून आष्टी पोलीस ठाण्यात नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
काय आहे प्रकार
बीडच्या आष्टी येथून जात पंचायतीच्या जाचाचा प्रकार समोर आला. जात पंचायतीने मालन फुलमाळी यांना शिक्षा दिली. करण त्यांचे सासरे नरसु फुलमाळी यांनी समाजाची परवानगी न घेता प्रेमविवाह केला. सासर्याने समाजाची परवानगी न घेता प्रेमविवाह केला आणि त्याचीच शिक्षा सुनेला मिळाली. 22 सप्टेंबर 2024 रोजी आष्टी तालुक्यातील डोईठाण येथे घडला. प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला. मात्र महिलेच्या तक्रारीवरून नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. या निमित्ताने पुन्हा एकदा जात पंचायतीचा मुद्दा समोर आला आहे.
जातपंचायतीचा काय निर्णय
जातपंचायतीने मालन फुलमाळी यांच्या सात पिढ्या समाजातून बहिष्कृत करण्याचे आदेश दिले. हे प्रकरण समोर आल्यानंतर जात पंचायतीने सासरे नरसु फुलमाळी यांना अडीच लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. परंतु अनेक वर्ष उलटल्यानंतरही हा दंड भरला न गेल्याने जात पंचायतीने त्यांच्या कुटुंबाला सात पिढ्या समाजातून बहिष्कृत करण्याचा आदेश दिला. तीरमाली समाजातील जात पंचायतीचा हा प्रकार आहे.
अखेर याप्रकरणी बीडच्या आष्टी पोलीस ठाण्यात नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सामाजिक बहिष्कार अधिनियमानुसार आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.