Aurangabad Crime : औरंगाबादमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, सहा आरोपींना अटक
नेहमीप्रमाणे पीडित मुलगी आज दुपारी शेतात मजुरीसाठी चालली होती. यादरम्यान आरोपी नराधमांनी मुलीला वाटेत अडवले आणि बळजबरीने निर्जन स्थळी नेले. तेथे नेऊन आळीपाळीने सहा जणांनी तिच्यावर बलात्कार केला.
औरंगाबाद : शेतात मजुरीसाठी चाललेल्या अल्पवयीन मुली (Minor Girl)वर गावातीलच सहा तरुणांनी सामूहिक बलात्कार (Gang Rape) केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमधील कन्नड तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी कन्नड ग्रामीण पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंद करत सहा आरोपींना अटक (Arrest) केली आहे. यापैकी एक अल्पवयीन असल्याची माहिती मिळते. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. देशात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा झाला. यावेळी जनतेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिलांचा आदर करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले. महिलांचा सन्मान, त्यांची सुरक्षा आणि त्यांची काळजी घेणं प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचं मोदींनी यावेळी म्हटलं. मात्र दुसरीकडे, महिलांच्या सन्मानाला केराची टोपली दाखवत औरंगाबादमधील नराधमांनी अल्पवयीन निष्पाप मुलीच्या अब्रूच्या चिंधड्या उडवल्या आहेत. यामुळे मुली आणि महिलांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न समोर उभा आहे.
शेतात मजुरीसाठी जात असताना नराधमांनी गाठले
पीडित अल्पवयीन मुलीच्या घरची परिस्थिती बेताची आहे. यामुळे पीडित मुलगी गावातील एका शेतात मजुरी करुन आई-वडिलांना हातभार लावत असे. नेहमीप्रमाणे पीडित मुलगी आज दुपारी शेतात मजुरीसाठी चालली होती. यादरम्यान आरोपी नराधमांनी मुलीला वाटेत अडवले आणि बळजबरीने निर्जन स्थळी नेले. तेथे नेऊन आळीपाळीने सहा जणांनी तिच्यावर बलात्कार केला. यानंतर आरोपींनी मुलीला तिथेच सोडून ते पसार झाले. यानंतर वेदनेने विव्हळत पीडित मुलगी कशीबशी घरी पोहचली. घरी आल्यानंतर तिने घडला प्रकार आईला सांगितला. यानंतर आईने तात्काळ कन्नड ग्रामीण पोलीस ठाणे गाठत फिर्याद नोंदवली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंद करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या. यापैकी काही आरोपींनी याआधीही एका मुलीवर बलात्कार केला होता. मात्र भितीपोटी मुलीने तक्रार दाखल केली नव्हती. (Kannada police arrested six accused in Aurangabad rape case)