गोरखपूर हत्याकांड काय आहे ज्यानं योगी सरकारला उत्तर प्रदेशात संकटात टाकलंय?’
बेदम मारहाण केल्यानंतर पोलीस अर्धमेल्या अवस्थेत असलेल्या मनिष गुप्ताला खाजगी रुग्णालयात घेऊन गेले आणि नंतर त्याला बीआरडी वैद्यकीय महाविद्यालयात नेले, जिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. यानंतर, घाईघाईत, पोलिसांनी मनीषचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.
लखनौ : उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात पोलिसांची खाकी वर्दी रक्ताने लाल झाली आहे. पोलिसांच्या गणवेशाला लागलेले रक्ताचे डाग एका निष्पाप व्यक्तीचे असल्याचं बोललं जातं. त्याचा दोष म्हणावा तर हाच, की तो आपल्या मित्रांसह गोरखपूरला फिरायला गेला होता. मनिष गुप्ता नावाचा हा इसम आपल्या मित्रांसह गोरक्षनाथ मंदिरात जाण्याच्या तयारीत होता. पण तितक्यात 6 वर्दीधारी गुंडांनी मारहाण करुन त्याचा जीव घेतला. हे सर्व कसे घडले आणि त्या निष्पापाच्या हत्येनंतर उत्तर प्रदेशात नेमकं काय घडत आहे? यावर नजर टाकूया.
मनिष गुप्ता कोण होता?
36 वर्षीय मनिष गुप्ता मूळचा कानपूरचा होता. कॉलेज संपल्यानंतर मनिष गुप्ताने एमबीए केले. पूर्वी तो एका खाजगी बँकेत मॅनेजर होता. पाच वर्षांपूर्वी त्याचे लग्न मीनाक्षीशी झाले होते. त्यांना एक अविराज नावाचा एक मुलगाही आहे. तो आता 4 वर्षांचा आहे. लग्नानंतर मनिष आणि मीनाक्षी नोएडाला आले, तिथे मनिष नोकरी करत होता. गेल्या वर्षी जेव्हा कोरोनामुळे लॉकडाऊन झाले, तेव्हा ते दोघेही कानपूर येथील त्यांच्या घरी परत गेले. आता तिथे राहून मनिष प्रॉपर्टीचे काम करत होता. मनिषचा कल राजकारणाकडे होता. त्याने चार महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशातील सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला. तो भाजपच्या सर्व कार्यक्रमात सहभागी होत असे.
मित्रांसह मनिष गोरखपूरला
पाच वर्षांपूर्वी मनिष गुप्ताची ओळख गुरुग्राम येथील रहिवासी अरविंद सिंग आणि प्रदीप कुमार यांच्याशी झाली. मनिषने एका कार्यक्रमात प्रदीप कुमार यांची भेट घेतली होती आणि प्रदीपच्या माध्यमातून अरविंद सिंग यांच्याशी त्याची मैत्री झाली होती. तिन्ही मित्रांमध्ये खूप घट्ट मैत्री होती. अवघ्या 10 दिवसांपूर्वी या तिघांच्या काही ओळखीच्या लोकांनी त्यांच्यासमोर गोरखपूरची स्तुती केली होती. ती स्तुती ऐकल्यानंतर मनिषने आपल्या दोन्ही मित्रांसह गोरखपूरला जाण्याचा बेत आखला.
काय आहे प्रकरण?
सोमवारी हे तिघे मित्र गोरखपूरला गेले. मनिष त्याचे मित्र अरविंद सिंग आणि प्रदीप यांच्यासोबत गोरखपूरमधील देवरिया बायपास रोडवरील कृष्णा पॅलेसच्या खोली क्रमांक 512 मध्ये राहत होते. तिघांनीही सोमवारी तिथे मतदान केले आणि नंतर सकाळी उठून गोरक्षनाथ मंदिरात जाण्याचा कार्यक्रम केला. गोरखपूरमधील बध्यापार येथील रहिवासी चंदन सैनी आणि राणा प्रताप चंद यांना भेटण्यासाठी ते आले होते. संध्याकाळी उशिरा तिघे मित्र हॉटेलमध्ये आले आणि झोपायची तयारी करायला लागले.
मनिषला झोप लागली होती. अरविंद आणि प्रदीप सुद्धा झोपायची तयारी करत होते. त्यानंतर रात्री 12.30 वाजता कोणीतरी त्याचा दरवाजा ठोठावला. जेव्हा प्रदीप आणि अरविंदने दरवाजा उघडला, तेव्हा रामगढताल पोलिस स्टेशनचे प्रभारी जेएन सिंह, भाजी मार्केट चौकीचे प्रभारी अक्षय मिश्रा यांच्यासह सहा पोलिस त्यांच्या खोलीत शिरले आणि त्यांना ओळखपत्र दाखवण्याबाबत त्यांच्याशी बोलण्यास सुरुवात केली.
पोलीस हॉटेलमध्ये
पोलिसांच्या सांगण्यावरून अरविंद आणि प्रदीप म्हणाले की ओळखपत्र खालील रिसेप्शनवर आहे. ज्यावर पोलिसांचा पारा चढला. तेव्हा दोघांनीही पोलिसांना त्यांचे आयडी दाखवले. मनीष झोपला होता, म्हणून दोघांनी त्याच्या पाकिटातून आयडी काढून पोलिसांना दाखवला. पण तरीही पोलीस त्यांना खाली जायला सांगायला लागले. दरम्यान, मनीषलाही जाग आली. पोलिसांचे वर्तन पाहून तिघेही म्हणाले की आम्ही दहशतवादी नाही.
मनिषच्या नाका-तोंडातून रक्तस्त्राव
पोलिसांनी तिघांनाही मारहाण करण्यास सुरुवात केली. दोन पोलिस कर्मचारी अरविंद आणि प्रदीप यांना घेऊन खाली गेले. काही वेळानंतर, जेव्हा पोलीस मनिषला लिफ्टमधून खाली ओढत आणले, तेव्हा त्याच्या नाका-तोंडातून रक्तस्त्राव होत होता. मनीषला पाहून त्याला बेदम मारहाण झाल्याचे स्पष्ट झाले.
बेदम मारहाण केल्यानंतर पोलीस अर्धमेल्या अवस्थेत असलेल्या मनिष गुप्ताला खाजगी रुग्णालयात घेऊन गेले आणि नंतर त्याला बीआरडी वैद्यकीय महाविद्यालयात नेले, जिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. यानंतर, घाईघाईत, पोलिसांनी मनीषचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. जेव्हा त्याच्या मित्रांनी फोनवर कुटुंबातील सदस्यांना याची माहिती दिली, तेव्हा त्यांना मोठा धक्काच बसला. कानपूर येथील मनीषच्या घरी स्मशानशांतता पसरली.
पोलिसांची लपवाछपवी
मंगळवारी मनिषची पत्नी आणि कुटुंबातील इतर सदस्य गोरखपूरला पोहोचले. त्याच दिवसापासून ही बाब स्थानिक माध्यमांनी उचलून धरली आणि पोलिसांनी हे प्रकरण लपवण्याचा अयशस्वी प्रयत्न सुरु केला. अगदी गोरखपूरच्या एसएसपीनेही या प्रकरणात एक कव्हर-अप स्टेटमेंट जारी केले. तो त्याच्या साथीदारांचे काळे धंदे स्पष्टपणे लपवण्याचा प्रयत्न करत होता.
पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काय
मंगळवारी मनिष गुप्ताच्या शवविच्छेदनाने पोलिसांचं खरं रुप उघडकीस आलं. ज्या क्रूरतेने 6 पोलिसांनी मनीषची हत्या केली, त्याचे वास्तव पोस्टमॉर्टम रिपोर्टनेच सांगितले. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासे झाले आहेत. पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार मनीष गुप्ताच्या मृत्यूमागील कारण मारहाण होते. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मनीष गुप्ताच्या शरीरावर चार गंभीर जखमांच्या खुणा आढळल्या आहेत. त्याच्या डोक्याला झालेली गंभीर दुखापत त्याच्यासाठी घातक ठरली.
मनीष गुप्ताच्या उजव्या हाताच्या मनगटाला काठीने गंभीर दुखापत झाल्याचे अहवालात समजले आहे. याशिवाय उजव्या हाताच्या बाह्यांवर काठी मारल्याच्या खुणाही आढळल्या असून डाव्या डोळ्याच्या वरच्या थरालाही दुखापत झाली आहे. मनीष गुप्ताच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाला हे दिसून येते.
पत्नी मीनाक्षी गुप्ता यांची मागणी
दरम्यान, मनिषची पत्नी मीनाक्षी गुप्ता यांचा एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात मिनाक्षी पोलिसांवरच मारहाणीचा आरोप करत आहे. मीनाक्षी गुप्ता हात जोडून रडत आहे आणि आपल्या पतीसाठी न्यायाची विनवणी करत आहे. हेच नाही तर पोलीस केस मागं घेण्यासाठी दबाव टाकत असल्याचाही आरोप मीनाक्षी यांनी केला आहे.
मीनाक्षी गुप्ताच्या हृदयस्पर्शी आवाहनाचा हा व्हिडिओ ट्विटरवर enBenarasiyaa नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. अवघ्या 30 सेकंदांच्या या क्लिपमध्ये मीनाक्षी हात जोडून रडताना दिसत आहे. त्याचवेळी काही लोक आणि पोलीस मागे उभे आहेत. या दरम्यान मीनाक्षी रडत म्हणते, मी हात जोडून विनंती करते ही माझ्या पतीची या हॉटेलमध्ये हत्या झाली आणि एका पोलिसवाल्याने हे कृत्य केलं आहे.
मीनाक्षी पुढे म्हणतात की, मला न्याय मिळवा. त्या म्हणतात की, पोलिसांच्या व्हिडीओत कुठंही रक्त दिसत नाही, पण त्यांच्या मित्रांनी सांगितलं की, मनीष हे रक्ताने माखलेले होते, पण पोलिसांच्या सांगण्यावरुन हॉटेलवाल्यांनी सगळं रक्त साफ केलं. कृपा करुन मला मदत करा. माझ्या पतीला न्याय द्या.
पत्नीवर दबाव आणण्याचा प्रयत्न
हद्द तर तेव्हा झाली, जेव्हा या दरम्यान, उच्च पोलीस अधिकाऱ्यांनी मनीषची पत्नी मीनाक्षी गुप्ता यांची भेट घेतली आणि त्यांना त्यांची तक्रार मागे घेण्यास सांगितले. त्यांनी 6 पोलिसांची कुटुंबे उद्ध्वस्त होतील असे सांगून मीनाक्षी यांच्यावर दबाव आणण्यास सुरुवात केली. पोलिस अधिकाऱ्यांच्या या कृत्याचा व्हिडीओही समोर आला. त्यामुळे प्रकरण तापले आहे. पोलिसांनी सरकारला पूर्णपणे लाज आणली. मीनाक्षी गुप्तांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस आणि सरकारला फटकारल्यानंतर अखेर गोरखपूर पोलिसांनी आरोपी पोलिसांविरुद्ध भादंविच्या कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल केला. बुधवारी या प्रकरणाची चौकशी झाली तेव्हा 6 आरोपी पोलिसांना निलंबित करण्यात आले आणि त्यापैकी तिघा जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सहा पोलिसांना निलंबित
मनीष गुप्ताच्या हत्येप्रकरणी ज्या सहा पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे त्यांची नावे रामगढताल पोलीस स्टेशनचे एसएचओ जगत नारायण सिंह, अक्षय मिश्रा, विजय यादव, राहुल दुबे, कॉन्स्टेबल कमलेश यादव आणि प्रशांत कुमार अशी आहेत. प्रॉपर्टी डीलर मनीष गुप्ता यांच्या पत्नी मीनाक्षी गुप्ता यांच्या तक्रारीवरून तीन पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसएचओ जगत नारायण सिंह, एसआय अक्षय मिश्रा आणि एसआय विजय यादव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उर्वरित तीन पोलिसांना अज्ञात म्हणून लिहिले आहे. मात्र, आतापर्यंत या प्रकरणात एकाही आरोपी पोलिस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आलेली नाही.
मनीष गुप्ताचा ऑडिओ
दरम्यान, मनीष गुप्ता आणि एका व्यक्तीमधील संभाषणाचा ऑडिओही समोर आला आहे. हा ऑडिओ मनीषच्या ठीक मृत्यूपूर्वीचा असल्याचे सांगितले जात आहे. या ऑडिओमध्ये मनीष म्हणतो, की पोलीस आले आहेत, इथले वातावरण बिघडत आहे. मनीष गुप्ता शेवटचे दुर्गेश बाजपेयीशी बोलले होते. रात्री 12:15 वाजताच्या सुमारास दुर्गेशचा फोन आला, तो म्हणाला की बेटा काही पोलीस आले आहेत, आम्ही झोपलो होतो, जेव्हा दरवाजा उघडला, तेव्हा ते म्हणाले की तुमचे आयडी दाखवा, कॅप्टन साहेबांचा आदेश आहे, मग आम्ही आपले आयडी दाखवले. मग पोलीस म्हणाले की तुमची बॅग दाखवा, बॅग चेक केल्यावर, मी म्हणालो की, जर आयडीच तपासायची होती, तर खालीच तपासायची होती. त्यावर एसओ म्हणाला की तुम्ही माझ्यासमोर तोंड चालवू नका, त्यानंतर पोलीस त्याला घेऊन गेले. त्यानंतर त्यांचा रक्तस्त्राव वाढत असल्याची माहिती मिळाली.
गुरुवारी, राज्याचे एडीजी (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार स्वतः या मुद्द्यावर पोलिसांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पुढे आले आणि त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी ‘चेंगराचेंगरीचा सिद्धांत’ सादर केला. त्यासोबत असेही म्हटले होते की जो कोणी दोषी असेल त्याला सोडले जाणार नाही. एडीजी प्रशांत कुमार यांच्या म्हणण्यानुसार सुरुवातीला असे सांगण्यात आले की पोलीस हॉटेलवर पोहोचले, हे तपासण्यासाठी की काही लोक तिथे कोणत्या कारणांसाठी थांबले आहेत. या दरम्यान चेंगराचेंगरी झाली आणि मनीष गुप्ता पडल्यामुळे जखमी झाले, असे सांगण्यात आले आहे. पण आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जात आहे.
पत्नीचा अंत्यसंस्कारांना नकार
दुसरीकडे, मनीषची पत्नी आणि इतर नातेवाईक मृतदेह घेऊन कानपूरला पोहोचले. पण बुधवारी त्यांनी अंतिम संस्कार करण्यास नकार दिला. मीनाक्षी गुप्ता म्हणाल्या की, आधी ती मुख्यमंत्र्यांना भेटतील मग अंत्यविधी होतील. पण कानपूरचे पोलीस आयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांच्या मनधरणीवर त्या तयार झाल्या. त्यांची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी भेट करून दिली जाईल असे आश्वासन देण्यात आले. परंतु यानंतर, कुटुंबीयांच्या सल्ल्याने त्यांनी पुन्हा अंतिम संस्कारांना नकार दिला. कानपूर येथील मनीषच्या घरी मृतदेह उचलण्यावरून पोलीस आणि कुटुंबीयांमध्ये बाचाबाचीही झाली आहे. लेखी मदत आणि कारवाईबाबत कुटुंब ठाम होते. त्याचवेळी सपा कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी प्रॉपर्टी डीलर मनीष गुप्ता यांच्या कुटुंबाची भेट घेतली. कानपूरचे व्यापारी मनीष गुप्ता यांची पोलिसांनी मारहाण केल्यानंतर गोरखपूरमधील एका हॉटेलमध्ये हत्या केली. सीएम योगींनी मनीषची पत्नी मीनाक्षी यांची भेट घेतली आणि तिला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यासोबतच त्यांनी मनीषच्या पत्नीला सरकारी नोकरी आणि नुकसानभरपाई देण्याबाबतही सांगितले. मनीष गुप्ता चार महिन्यांपूर्वी भाजपमध्ये सामील झाले होते.
संबंधित बातम्या :
आरे कॉलनीत 64 वर्षांच्या आजीवर बिबट्याचा हल्ला, आजीने काठीने बिबट्याचं तोंड फोडलं, व्हिडीओ व्हायरल
पुन्हा एकदा चर्चेत आली रानू मंडल, तिच्याच शैलीत गायलं ‘Manike Mage Hithe’ गाणं – पाहा व्हिडीओ