मोठी बातमी ! रश्मी ठाकरे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल होणार; किरीट सोमय्या पोलीस ठाण्यात पोहोचले
रश्मी ठाकरे यांच्या जमीन व्यवहाराची कागदपत्रे गहाळ करण्यात आले आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी या जमीन व्यवहाराचे कागदपत्रे गहाळ करायला लावले आहेत.
रेवदंडा: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 19 बंगल्यांच्या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या रश्मी ठाकरे यांच्या विरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहेत. त्यासाठी किरीट सोमय्या रेवदंडा पोलीस ठाण्यात पोहोचले आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
रश्मी उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यात जमिनीचे व्यवहार झाले आहेत. रश्मी ठाकरे यांच्या नावावर कोकणात 19 बंगले होते. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेचा गैरवापर करत रश्मी ठाकरे यांचे नाव त्या व्यवहारातून कमी केले. त्या विरोधात आज आम्ही रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहोत, असं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगितलं.
रश्मी ठाकरे यांच्या या व्यवहाराची चौकशी व्हायला हवी अशी मागणी आम्ही करणार आहोत. ज्याप्रमाणे अनिल परब यांच्या रिसॉर्टची चौकशी झाली आणि कारवाई करण्यात आली. तशीच कारवाई रश्मी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात करण्यात यावी अशी आमची मागणी आहे, असंही सोमय्या यांनी सांगितलं.
रश्मी ठाकरे यांच्या जमीन व्यवहाराची कागदपत्रे गहाळ करण्यात आले आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी या जमीन व्यवहाराचे कागदपत्रे गहाळ करायला लावले आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास झाला पाहिजे. म्हणूनच आम्ही तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, किरीट सोमय्या यांनी काल एक सूचक ट्विट केलं होतं. त्यात त्यांनी उद्यापासून ठाकरे कुटुंबाच्या 19 बंगल्याच्या घोटाळ्यांचे हिशेब सुरू होणार असल्याचं म्हटलं होतं. उद्या नवीन वर्ष आहे. सकाळी 11.30 वाजता जाऊन रेवदंडा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करणार आहे, असंही त्यांनी म्हटलं होतं.