मूल होत नाही म्हणून मित्राच्या मुलाचं अपहरण, नंतर निर्घृण हत्या, मृतदेह शेतात पुरला, कोल्हापूर हादरलं
कोल्हापुरात एक प्रचंड संतापजनक घटना समोर आली आहे. मुलगा होत नाही म्हणून मित्राच्या सात वर्षीय मुलाचं अपहरण करुन त्याची निघृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना कोल्हापूरच्या कागल तालुक्यात घडली आहे.
कागल (कोल्हापूर) : महाराष्ट्रात आता काही घटना इतक्या चित्रविचित्र आणि संतापजनक घडू लागल्या आहेत की हा पुरोगामी महाराष्ट्र आहे की बिहार, उत्तर प्रदेश सारखं राज्य? असा सवाल मनात आल्याशिवाय राहणार नाही. विशेष म्हणजे कोल्हापुरात एक प्रचंड संतापजनक घटना समोर आली आहे. मुलगा होत नाही म्हणून मित्राच्या सात वर्षीय मुलाचं अपहरण करुन त्याची निघृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना कोल्हापूरच्या कागल तालुक्यात घडली आहे. विशेष म्हणजे हा एक नरबळीचा प्रकार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. या घटनेमुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्हा हादरला आहे.
नेमकं प्रकरण काय?
स्वत:ला मूल होत नाही म्हणून मित्राच्या मुलाचे अपहरण करुन त्याची हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना सोनाळी (ता. कागल) येथे शुक्रवारी (20 ऑगस्ट) सकाळी उघडकीस आली. वरद रवींद्र पाटील असे बळी देण्यात आलेल्या सात वर्षाच्या बालकाचे नाव आहे. त्याचे सावर्डे बुद्रुक (ता. कागल) येथून दोन दिवसांपूर्वी अपहरण झाले होते. याबाबतची त्याचे वडील रवींद्र गणपती पाटील यांनी मुरगूड पोलिसात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास करत संशयित आरोपी ताब्यात घेऊन चौकशी केली.
आरोपीकडून गुन्ह्याची कबुली
पोलिसांनी आरोपी मारुती वैद्य (वय 45) याची चौकशी केली असता त्याने मुलास गळा दाबून शेतामध्ये हत्या केल्याची कबुली दिली. मुलाचा मृतदेह सावर्डे गावच्या तलावापासून 200 मीटर अंतरावरील शेतामध्ये सापडला. यावेळी पंचक्रोशीतील नागरिक आणि महिलांनी प्रचंड संताप व्यक्त करत पोलिसांना घेराव घातला. आरोपीस बारा दिवसाच्या आत फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
वरद आजोळला आला असताना संतापजनक प्रकार
वरद हा आपले आजोळ सावर्डे बुद्रुक येथे आजोबा दत्तात्रय शंकर म्हातुगडे यांच्या घराच्या वास्तुशांती कार्यक्रमासाठी आई-वडिलांसोबत आला होता. तो मंगळवारी (17 ऑगस्ट) रात्री साडेआठच्या सुमारास बेपत्ता झाला होता. रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी सर्वत्र शोध घेवूनही त्याचा शोध लागला नाही. भरवस्तीत असणाऱ्या गल्लीतून वरद गायब कसा झाला? याबाबत तर्कवितर्क वर्तवले जात होते. या गल्लीत नेहमी नागरिकांची वर्दळ असते, अशा ठिकाणाहून तो गायब झाल्याने त्याचवेळी हे कृत्य कुणी माहितीतील व्यक्तीचे असण्याची शक्यता व्यक्त झाली होती.
ग्रामस्थांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा
संबंधित घटनेनंतर आरोपी मारुती वैद्य याला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी सोनाळी गावासह पंचक्रोशीतील नागरिकांनी आज (21 ऑगस्ट) मुरगूड पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. या मोर्चामध्ये महिला तसंच लहान मुलं मोठ्या संख्येन सहभागी झाले होते. ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी देखील केल्या. त्यामुळे पोलीस ठाण्याबाहेर काही काळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान ही हत्या नरबळीच्या प्रकारातून झाल्याची चर्चा काल दिवसभर सुरु होती. मात्र प्राथमिक तपासात तसं दिसत नसल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. या प्रकरणाची सर्व बाजूने कसून चौकशी करून हत्येचे कारण समोर आणलं जाईल, असं पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितलंय.
हेही वाचा :
दुसरं लग्न केलं, मुलगी झाली, पण पत्नीच्या चारित्र्यावर संशय, राक्षसी पतीने जे केलं ते हादरवणारं
वर्दीला डाग, पोलीस हवालदाराकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग, जिथे कार्यरत, त्याच पोलीस ठाण्यात बेड्या