ज्या दिवशी सलमान खान याला मारेल तेव्हाच खरा… थेट तुरुंगातून सुपारी किलर गुंडाची धमकी; काय आहे प्रकरण?
लॉरेन्स बिश्नोई या सुपारी किलरने अभिनेता सलमान खानला मारण्याची धमकी दिली आहे. सलमानने बिकानेरच्या मंदिरात माफी मागावी, अन्यथा मी सलमानला मारेल, अशी धमकीच त्याने दिली आहे.
चंदीगड : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याला एका सुपारी किलर कुविख्यात गुंडाने थेट तुरुंगातून धमकी दिली आहे. लॉरेन्स बिश्नोई असं या गुंडाचं नाव असून तो गेल्या काही वर्षापासून सलमान खानच्या मागेहात धुवूनच लागला आहे. जेव्हा मी सलमान खानला मारेल तेव्हाच खरा गुंड म्हणवून घेईल, अशी धमकीच बिश्नोईने दिली आहे. तुरुंगात हातापायात बेड्या घालून शिक्षा भोगत असलेल्या बिश्नोईने थेट धमकी दिल्याने पोलिसांचीही झोप उडाली आहे.
तुरुंगात राहूनही लॉरेन्स बिश्नोई अनेक कांड करत आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्याची धमकी गांभीर्याने घेतली आहे. पंजाबचा प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवाला हत्याकांडातही बिश्नोईनचं नाव होतं. त्यामुळे बिश्नोई काहीही करू शकत असल्याने पोलीस अधिकच अलर्ट झाले आहेत. आता तर त्याने थेट सलमान खानला धमकी दिली आहे. त्यामुळे पोलिसांचं टेन्शन वाढणं स्वाभाविक आहे.
29 मे 2022 रोजी त्याने चॅलेंज देऊन हत्या घडवून आणली होती. आजवरची ही सर्वात मोठी गुन्हेगारी घटना मानली जात आहे. एवढेच नव्हे तर पोलिसांचा एवढा पहारा असतानाही त्याने काही दिवसापूर्वी एका चॅनलला मुलाखत देऊन सर्वांची झोप उडवून लावली होती. आता तर त्याने ज्या दिवशी मी सलमान खानला मारेल, तेव्हाच खरा गुंड बनेल, असं म्हटलं आहे.
देशातील सुरक्षा यंत्रणांनीही बिश्नोई याच्या धमकीला गांभीर्याने घेतले आहे. त्याच्या विधानामागचं सत्य शोधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तुरुंगात असतानाही बिश्नोईने सलमान खानला दिलेल्या धमकीत किती तथ्य आहे? तो सलमानवर हल्ला करू शकतो का? याचा तपास यंत्रणा घेत आहेत. याशिवाय ही केवळ प्रसिद्धीसाठीची स्टंटबाजी तर नाही ना? स्वत:च्या नावाचा दबदबा निर्माण करण्यासाठीची त्याची ही खेळी तर नाही ना? याचाही पोलीस शोध घेत आहेत.
काय म्हणाला बिश्नोई?
एका टीव्ही चॅनलला त्याने दोन मुलाखती दिल्या. त्यात त्याने कोणत्याही परिस्थितीत सलमानला मारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असं म्हटलंय. सलमानला मारेल, तेव्हाच स्वत:ला गुंड म्हणवून घेईल, असंही त्याने म्हटलंय. गोइंदवाल तुरुंगातील गँगवारवरही तो बोललाय. तुरुंगातील त्याच्या या मुलाखतीने सर्वच हादरून गेले आहेत. पंजाबचे पोलीस महानिरीक्षक राहुल यादव यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. बिश्नोईच्या दोन्ही मुलाखती पंजाबच्या कोणत्याही तुरुंगातील नाहीये, असं यादव यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, बिश्नोई याने पंजाबच्या तुरुंगातून मुलाखत दिली की नाही हे महत्त्वाचे नाही. त्याने थेट सलमानचं नाव घेऊन धमकी दिली आहे. हे महत्त्वाचं आहे. विशेष म्हणजे पोलिसांचा एवढा पहारा असताना त्याने थेट चॅनलला मुलाखत दिली हे धक्कादायक आहे. मी तर अजून विद्यार्थी आहे. कॉलेजातून बाहेर पडल्यावर मी घर पाहिलेच नाही. थेट तुरुंगात आलो आहे, असंही तो या मुलाखतीत म्हणतोय.
बिकानेरच्या मंदिरात सलमानने माफी मागावी
सलमान खानने माफी मागितल्यास वाद मिटेल. अट एवढीच आहे की, त्याने बिकानेरच्या मंदिरात जाऊन माफी मागितली पाहिजे. गेल्या चारपाच वर्षापासून सलमानला मारण्याची माझी इच्छा आहे. सलमान खान अहंकारी आहे. रावणापेक्षाही त्याचा अहंकार अधिक आहे, असंही तो म्हणतो.