एखाद्याला रात्रीचा आसरा देणं पडू शकतं महागात… टेरेसवर झोपायला गेलेल्या पती-पत्नीचं काय झालं?
कुणी कुणावर आणि किती विश्वास ठेवावा हा मोठा प्रश्न आहे. लोक ज्याने आसरा दिला त्यालाही गोत्यात आणू शकतात. त्यामुळे एखाद्याला विश्वासाने घरात घ्यावं की घेऊ नये हाच मोठा प्रश्न आहे.
गया | 13 सप्टेंबर 2023 : इतरांवर किती विश्वास ठेवायचा हे तुमचं तुम्हीच ठरवा. कुणावरही कधीच विश्वास ठेवू नका. नाही तर जीवाला मुकलाच म्हणून समजा. एका जोडप्याच्या बाबतीत असंच घडलंय. पत्नी आजारी होती म्हणून दोघे नवरा बायको दुसऱ्या गावाला गेले. रात्र झाली म्हणून ओळखीच्या व्यक्तीच्या घरी थांबले. रात्री टेरेसवर जाऊन झोपले. पण ते दुसऱ्या दिवशीची सकाळ पाहू शकले नाही. ती रात्र त्यांच्यासाठी खूनी रात्र ठरली. असं काय घडलं त्या दोघांमध्ये?
पत्नी आजारी असल्याने तिला घेऊन नवरा गयेला आला होता. रात्र झाल्याने जुन्या घरमालकाच्या घरी तो गेला. पत्नीचा उपचार करण्यासाठी आलो होतो. रात्र झालीय. रात्रभर थांबायचं होतं, असं त्याने घर मालकाला सांगितलं. त्यानंतर घर मालकाने त्यांना राहण्याची परवानगी दिली. त्यानुसार हे दोघे टेरेसवर झोपायला गेले. सकाळी घरातील लोकांनी पाहिले तर त्या व्यक्तिच्या पत्नीचा गळा चिरलेला होता. टेरेसवर रक्तच रक्त पसरलेलं होतं.
अन् पायाखालची जमीन सरकली
टेरेसवर मृतदेह पाहून घरातील लोकांच्या पायाखालची जमीनच सरकली. एव्हाना गावात बातमी पसरली. स्थानिकांनी प्रचंड गर्दी केली. या घटनेची माहिती मिळताच डीसीपी पीएन साहू आणि रामपूर पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी अनुग्रह मगध मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये पाठवला. मात्र, या घटनेनंतर मृत महिलेचा पती फरार झाला आहे. मोहन यादव असं त्याचं नाव आहे. तो औरंगाबाद जिल्ह्यातील तेंदुआ गावातील रहिवाशी आहे. तर त्याची पत्नीही 30 ते 32 वर्षाची आहे.
पोलीस तपास सुरू
दरम्यान, त्याने पत्नीला का मारलं याचा खुलासा होऊ शकला नाही. दोघांमध्ये भांडण झालं होतं का याचीही माहिती नाही. पत्नी आजारी आहे म्हणून गावाहून शहरात आणणाऱ्या नवऱ्याने अचानक टोकाचं पाऊल कसं उचललं? पत्नीचा खून केल्यानंतर तो पळून कुठे गेला? याची काहीच माहिती नसून पोलीस याबाबतचा तपास करत आहेत. या महिलेच्या कुटुंबीयांना हत्येची माहिती देण्यात आली आहे.