MBA करूनही मिळाली नाही चांगली नोकरी; मग ‘पुष्पा’ बघितल्यानंतर बनला कोट्यवधींचा चंदन तस्कर
अल्लू अर्जुनचा 'पुष्पा' बघून MBA पास झालेला तरुण करू लागला चंदनाची तस्करी
उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेशच्या पोलिसांनी लाल चंदनाच्या तस्करीच्या आरोपाखाली सात जणांना मथुरेतून अटक केली. यातील एका आरोपीने एमबीएच्या पदवीचं शिक्षण पूर्ण केलंय. सुमित दास ऊर्फ संजू असं त्या आरोपीचं नाव आहे. छत्तीसगढमधल्या कांकोर इथं तो राहणारा आहे. साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ या चित्रपटातून प्रेरणा घेऊन तो तस्करीत सामील झाला, असं म्हटलं जातंय. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
अटक केलेल्या सात जणांमध्ये दीपक ऊर्फ दलवीर, अजित कुमार यादव, सुमित ऊर्फ राम, चंद्र प्रताप ऊर्फ बब्बू, सुमित दास, जितेंद्र आणि रंजीत यांचा सहभाग आहे. सोमवारी मथुरेच्या हायवे पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातून यांना अटक करण्यात आली. वनविभागाच्या टीमसोबत मिळून केलेल्या या कारवाईत 563 किलोग्रॅम लाल चंदन जप्त केलं गेलंय. या चंदनाची किंमत जवळपास दोन कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातंय.
सुमितचे वडील व्यावसायिक असल्याचं कळतंय. सुमितने एमबीएचं शिक्षण पूर्ण केलंय. शिक्षणानंतर त्याने बऱ्याच ठिकाणी नोकरीसाठी प्रयत्न केले. मात्र त्याला अपेक्षित नोकरीच मिळाली नाही. काहींनी त्याला नोकरीची ऑफरसुद्धा दिली, मात्र तिथे पगार मी आणि काम जास्त होतं, म्हणून त्याने काही दिवस काम केल्यानंतर नोकरी सोडली. कुटुंबीय सतत नोकरीसाठी दबाव टाकत होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली.
सुमितने पोलिसांना सांगितलं की तो पुष्पा हा चित्रपट पहायला गेला होता. त्यातूनच त्याला चंदनाच्या तस्करीची कल्पना मिळाली. लिहिता-वाचता न येताही कोट्यवधींची कमाई केली जाऊ शकते, हे त्यातून कळल्याचं सुमित म्हणाला. त्यानंतर त्याने अशा लोकांचा शोध घेतला, जे लाल चंदनाची तस्करी करतात.
आंध्र प्रदेशमध्ये अशाच एका व्यक्तीबद्दल सुमितला माहिती मिळाली, की तो तिथून उत्तरप्रदेशमध्ये मथुरा-वृंदावनला चंदनाची तस्करी करायचा. तेव्हापासून सुमितने तस्करी करायला सुरुवात केली. पोलिसांनी इतर सहा जणांकडून चौकशी सुरू केली आहे.