Mumbai Crime: सांताक्रूझच्या क्लबमध्ये डान्स करता करता चोरी करायचा, 28 वर्षीय मेकॅनिकल इंजिनीअर अटकेत
Mumbai Crime: आरोपी गेल्या दोन महिन्यांपासून हा गुन्हा करत होता. तो डान्स फ्लोअरकडे जायचा आणि लोकांचे खिसे रिकामे करायचा.
मुंबई: सांताक्रूझ पश्चिम येथील बॉम्बे अड्डा क्लबमधून (Bombay Adda Club) महागडे मोबाइल फोन चोरल्याप्रकरणी एका २८ वर्षीय मेकॅनिकल इंजिनीअरला (Mechanical Engineer) सांताक्रूझ पोलिसांनी अटक केलीये. पोलिसांनी सांगितले की, आरोपी गेल्या दोन महिन्यांपासून हा गुन्हा करत होता. तो डान्स फ्लोअरकडे जायचा आणि लोकांचे खिसे रिकामे करायचा. पोलिसांनी त्याच्याकडून तीन आयफोन जप्त केले आहेत. अद्वैत राजन महाडिक असं या आरोपीचं नाव असून तो कांदिवली पूर्व येथील आकुर्ली रोड, नॅशनल अॅव्हेन्यू बिल्डिंगमध्ये राहणारा आहे. तो एमएनसीमध्ये अभियंता म्हणून काम करतो. त्याचा पगार त्याच्या महागड्या लाइफस्टाइलला (Lifestyle)धरून नसल्याने त्याने चोरीचा मार्ग अवलंबला, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्याचं नुकतंच लग्नही झालं होतं आणि त्याच्या जबाबदाऱ्याही वाढल्या होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात सांताक्रूझ पोलिसांकडे अड्डा क्लबमधून आयफोन चोरीच्या तीन तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. पोलिसांनी क्लबचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, प्रत्येक वेळी मजल्यावर सुमारे 200 लोक असल्याने आरोपींचा शोध घेणे त्यांना कठीण झाले.
सर्व फोनची किंमत दीड लाख रुपयांपेक्षा जास्त
सांताक्रूझ पोलीस ठाण्याचे पीएसआय सचिन त्रिमुखे यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं की, “सर्व घटना एका आठवड्याच्या शेवटी घडल्या. अद्वैत क्लबमध्ये यायचा आणि डान्स फ्लोअरवर असताना चोरी करायचा. लोकांच्या खिशातून मोबाइल चोरण्यात तो यशस्वी झाला. सर्व फोनची किंमत दीड लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.”
कांदिवलीच्या भागात शोध घेण्यात आला
“आम्ही झोन 9 चे वरिष्ठ निरीक्षक बाळासाहेब तांबे आणि डीसीपी मंजुनाथ सिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल फाटक, पोलीस नाईक सावंत, कॉन्स्टेबल हिरेमठ, नाईक पाटील आणि कॉन्स्टेबल बडे यांचा समावेश असलेले एक पथक तयार केले आणि सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यावेळी महाडिक यांनी फोन फ्लिक करताच आम्हाला दिसले. तो क्लबमधून बाहेर पडल्यानंतर आम्ही त्याचा पाठलाग केला आणि शेवटी, कांदिवलीच्या भागात त्याचा शोध घेण्यात आला,” पीएसआय त्रिमुखे पुढे म्हणाले.
ब्रँडेड कपडे घालणे आवडते
“चौकशीदरम्यान, आम्हाला कळले की महाडिक यांना ब्रँडेड कपडे घालणे आवडते,” पीएसआय त्रिमुखे म्हणाले, “इतर कोणत्याही क्लब्सना अशाच घटना घडल्या नाहीत ना हे देखील आम्ही तपासत आहोत. आम्ही आरोपीला भादंवि कलम 380 (राहत्या घरात चोरी) अंतर्गत अटक केली आहे.”