बिस्किट घेण्याच्या बहाण्याने किराणा दुकानात शिरले, महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली, सीसीटीव्हीत दिसणारा चोरटा अखेर जेरबंद
अंबरनाथच्या खुंटवली परिसरात झालेल्या सोनसाखळी चोरीचा अखेर उलगडा झाला आहे. या सोनसाखळी चोराला अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
अंबरनाथ (ठाणे) : अंबरनाथच्या खुंटवली परिसरात झालेल्या सोनसाखळी चोरीचा अखेर उलगडा झाला आहे. या सोनसाखळी चोराला अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून अन्य गुन्ह्यांचीही उकल करण्यात पोलिसांना यश आलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
अंबरनाथच्या खुंटवली परिसरात आशा कराळे यांचं टेलरिंग आणि किराणा दुकान आहे. या दुकानात 26 ऑगस्ट रोजी दुपारी दोन सोनसाखळी चोरांनी बिस्कीट घेण्याच्या निमित्तानं जाऊन आशा कराळे यांचं मंगळसूत्र चोरलं होतं. ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. अरविंद वाळेकर यांचं निवासस्थान सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील ठिकाण आहे. त्यांच्या घरासमोरच चेन स्नॅचिंग झाल्यामुळे पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं.
पोलिसांनी आरोपीला पकडलं कसं?
या घटनेनंतर पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरु होता. या दरम्यान आरोपी प्रकाश उर्फ पिल्ल्या प्रकाश ठमके याला भिवंडीच्या शांतीनगर पोलिसांनी अटक केल्याची माहिती अंबरनाथ पश्चिम पोलिसांना मिळाली. त्यानुसार अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी त्याचा ताबा घेत चौकशी केली असता त्याने खुंटवलीतील चेन स्नॅचिंग आपणच केल्याची कबुली दिली. या चोरीसाठी वापरलेल्या टीव्हीएस अँटोरक्यू आणि यामाहा ब्लॅक गोल्ड या गाड्या शिवाजीनगर आणि मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याची कबुली आरोपी आरोपी प्रकाश ठमके याने दिली आहे.
आरोपीवर याआधीदेखील पाच गुन्हे
मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेंट्रल पार्क हॉटेलमधून पल्सर 220 गाडी चोरल्याची आणि फॉलोवर लेन परिसरात एक चेन स्नॅचिंग केल्याची कबुलीही या आरोपीने दिली आहे. आरोपी प्रकाश ठमके याच्यावर यापूर्वी गंभीर स्वरुपाचे 5 गुन्हे दाखल आहेत. त्यात आता या नव्या गुन्ह्यांची भर पडली आहे. अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली डिटेक्शन टीमचे उपनिरीक्षक प्रवीण खोचरे आणि त्यांच्या टीमने या गुन्ह्याचा तपास केल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांनी दिली आहे.
चोरट्यांनी कामावर निघालेल्या चाकरमान्याचा मोबाईल हिसकावला
चैन स्नॅचिंगसारख्याच मोबाईल हिसकावण्याच्या घटनादेखील हल्ली वाढताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी दुचाकीवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी कामावर निघालेल्या एका चाकरमान्याचा मोबाईल चोरल्याची घटना समोर आली होती. उल्हासनगरच्या कॅम्प 4 भागात लालचक्की परिसर आहे. या मराठीबहुल भागात मोठ्या प्रमाणात चाकरमानी वास्तव्याला असून रेल्वे स्टेशन अगदी हाकेच्या अंतरावर असल्यानं इथले प्रवासी सकाळी चालत रेल्वे स्टेशन गाठतात.
अशाच पद्धतीने 9 सप्टेंबर रोजी पहाटे 6 च्या सुमारास एक प्रवासी कामावर जायला पायी निघाला होता. यावेळी लालचक्की भागातल्या कमानीजवळ बाईकवरून आलेल्या दोन चोरट्यांनी या चाकरमान्याचा शर्टच्या खिशात ठेवलेला मोबाईल हिसकावत पळ काढला. ही संपूर्ण घटना तिथल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. याप्रकरणी पोलिसात तक्रार करण्यात आली असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.
हेही वाचा :
अंबरनाथमध्ये हॉटेल चालकाचं शरमेने मान खाली घालवणारं कृत्य, दुसऱ्यांदा वीजचोरी, गुन्हा दाखल