Aryan Khan Drugs Case | आर्यन खानच्या वतीने रोहतगी बाजू मांडणार, जामीन अर्जावर बॉम्बे हायकोर्टात सुनावणी
20 ऑक्टोबर रोजी एनडीपीएस कायद्याच्या अंतर्गत विशेष न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर आर्यन खानने तातडीच्या सुनावणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर आज उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे
मुंबई : मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात आज (मंगळवारी) सुनावणी होणार आहे. 20 ऑक्टोबर रोजी एनडीपीएस कायद्याच्या अंतर्गत विशेष न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर आर्यन खानने तातडीच्या सुनावणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. नंतर या प्रकरणात आर्यनची न्यायालयीन कोठडी 30 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली.
आर्यन खानच्या वतीने जामीन प्रकरणात मी आज मुंबई उच्च न्यायालयात हजर राहीन, अशी माहिती भारताचे माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी दिली
Drugs on cruise ship case | I will appear for Aryan Khan in his bail matter today in Bombay High Court: Mukul Rohatgi, Former Attorney General of India
(file photo) pic.twitter.com/Ry4dhslTlz
— ANI (@ANI) October 26, 2021
अलिकडेच शाहरुख खान आपल्या मुलाला भेटण्यासाठी तुरुंगात गेला होता. त्यानंतर काल आई गौरी खानही आर्यनला भेटायला आर्थर रोड जेलमध्ये गेली होती.
ड्रग्स प्रकरणात अडकलेल्या आर्यन खानच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये अभिनेत्री अनन्या पांडेचेही नाव समोर आले आहे. गप्पांमध्ये दोघे ड्रग्जबद्दल बोलत असल्याचा संशय एनसीबीने व्यक्त केला होता. त्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अनन्या पांडेची चौकशी करत आहे. एनसीबीने अनन्याला समन्स पाठवत सलग 2 दिवस तिची चौकशी केली.
आर्यन खानचा मुक्काम कोठडीत कसा वाढत गेला ?
2 ऑक्टोबर – आर्यन खानला अटक, एक दिवसाची कोठडी
आर्यन खान तसेच इतर सात आरोपींना क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. यामध्ये आर्यनचा मित्र अरबाज मर्चंट तसेच मॉडेल मूनमून धमेचा यांचा समावेश होता. अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाने त्यांना सुरुवातीला एक दिवसाची एनसीबी कोठडी सुनावली होती.
4 ऑक्टोबर – तीन दिवसांची एनसीबी कोठडी
आर्यन खानची एक दिवसाची कोठडी संपल्यानंतर 4 ऑक्टोबर रोजी त्याला पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. त्यानंतर आर्यन खान तसेच त्याच्या इतर साथीदारांना 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली होती. या कालावधीत एनसीबीने आर्यन खानची कसून चौकशी केली होती.
7 ऑक्टोबर – 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी
तीन दिवसांच्या एनसीबी कोठडीचा कालावधी संपल्यानंतर न्यायालयाने आर्यन खानसह इतर सात आरोपींना 7 ऑक्टोबर रोजी तब्बल 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यावेळी कोर्टात आर्यन खान तसेच एनसीबीच्या वकिलांची खडाजंगी झाली होती. आर्यन खानच्या बाजूने अॅड सतीश मानेशिंदे यांनी बाजू मांडली होती. तर एनसीबीच्या बाजूने एएसजी अनिल सिंग यांनी युक्तिवाद केला होता.
14 ऑक्टोबर – न्यायालयाने निकाल राखून ठेवला
14 ऑक्टोबर रोजी आर्यन खान, मूनमून धमेचा तसेच अरबाज मर्चंट यांना एनडीपीएस मुंबई कोर्टासमोर हजर करण्यात आलं. यावेळी न्यायालयात तिन्ही आरोपींच्या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली. पण न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला.
20 ऑक्टोबर – आर्यनचा जामीन अर्ज फेटाळला
एनडीपीएसच्या विशेष न्यायालयाने आर्यन खानचा जामीन अर्ज पुन्हा एकदा फेटाळला. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही व्ही पाटील यांनी या प्रकरणावर सुनावणी घेतली. आर्यन खानसह अरबाज मर्चंट, मुनुमन धामेचा या तिघांचाही जामीन अर्ज मुंबईतील विशेष एनडीपीएस कोर्टाने फेटाळून लावला आहे.
संबंधित बातम्या :
आधी शाहरुख, आता गौरी खान लेक आर्यनला भेटायला आर्थर रोड जेलमध्ये!
आर्यन खानचा मुक्काम तुरुंगातच, 30 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत वाढ