मृत डॉक्टरच्या खात्यातून कोट्यवधींचा गंडा, बँक कर्मचारीच निघाला लुटारु
गोरेगाव येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत डॉ. पाल यांचे खाते होते. डॉक्टर पाल यांचा 2014 मध्ये मृत्यू झाला. डॉक्टरच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी त्यांचे खाते बंद केले नव्हते.
मुंबई : मुंबईतील एका मृत डॉक्टरच्या खात्यातून एक कोटी 29 लाखांची फसवणूक करणाऱ्या बँक कर्मचाऱ्याला गोरेगाव पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी संबंधित बँक कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. परवेज शाह असे आरोपीचे नाव असून तो 2014 मध्ये पीव्हीसी कॉन्ट्रॅक्ट अंतर्गत बँकेत काम करत होता. अटकेनंतर न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.
2014 मध्ये झाला डॉक्टरचा मृत्यू
गोरेगाव येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत डॉ. पाल यांचे खाते होते. डॉक्टर पाल यांचा 2014 मध्ये मृत्यू झाला. डॉक्टरच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी त्यांचे खाते बंद केले नव्हते. डॉक्टरच्या खात्यात व्याज जमा होत होते. तसेच खात्यात मोठी रक्कमही होती.
बनावट कागदपत्रांच्या आधारे विविध खात्यात पैसे पाठवले
आरोपी परवेजला याची माहिती होती. आरोपीने याचा फायदा घेत हा लुटीचा प्लान तयार केला. डॉक्टरच्या खात्यातून बनावट कागदपत्रांच्या आधारे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या गोरेगाव शाखेतून वेगवेगळ्या खात्यांवर पैसे पाठवून कोट्यवधींची फसवणूक केली.
बँकेच्या चौकशीत फसवणूक उघड
आरोपीने इंटरनेट आणि मोबाईल बँकिंगचा वापर करून ओव्हरड्राफ्ट खात्यातून 1 कोटी 29 लाख रुपये काढले आहेत. डॉक्टरच्या खात्यात व्याज जमा होत असल्याने बँकेने चौकशी सुरु केली. चौकशीदरम्यान बँकेला संशय आला असता बँक प्रशासनाने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता हा बनाव समोर आला.
आरोपी अटक
पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार हे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य व्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत. बँक व्यवस्थापकाने जानेवारी महिन्यात सायबर सेलकडे तक्रार केली होती. आरोपीला आता अटक करण्यात आली आहे.