आधी पाठलाग, नंतर महिलेला अडवत अश्लिल चाळे, डोंबिवलीत रोड रोमियोला चोपचोप चोपला
डोंबिवलीत भर रस्त्यात कामावरून घरी परतणाऱ्या तरुणीची छेड काढणाऱ्या तरुणाला स्थानिक तरुणांनी चांगलाच चोप दिल्याची घटना समोर आली आहे. संबंधित घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही होत आहे.
सुनील जाधव, Tv9 प्रतिनिधी, डोंबिवली | 2 फेब्रुवारी 2024 : ‘भारत माझा देश आहे. मी सर्वांशी सौजन्याने वागेल’, अशी प्रतिज्ञा प्रत्येकजण शाळेत घेतो. पण तसं सौजन्याने खरंच काही लोक वागत नाहीत. परिणामी त्यांना त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. डोंबिवलीत एका तरुणाला त्याचा प्रत्यय आलाय. या तरुणाने एका तरुणीला रस्त्यात अडवत तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिथल्या स्थानिक तरुणांनी त्याला बरोबर अद्दल घडवली. संबंधित घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या आरोपी तरुणाची मजल इतकी वाढली की तो डोंबिवलीत भर रस्त्यात कामावरून घरी परतणाऱ्या तरुणीची छेड काढत होता. पण त्याच्या या कृत्यानंतर स्थानिक तरुणांनी त्याला चांगलाच चोप दिला. संबंधित घटना ही गुरुवारी (1 फेब्रुवारी) रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं?
डोंबिवली आजदेपाडा परिसरात राहणारी महिला काल रात्रीच्या सुमारास कामावरून घरी परतत होती .एक रोड रोमियो तिचा पाठलाग करत होता .अंधाराचा फायदा घेत या रोड रोमियोने महिलेचा गळा दाबत तिच्याशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. महिलेने प्रतिकार करत आरडाओरड सुरू केली. महिलेची आरडाओरड एकूण स्थानिक तरुणांनी धाव घेतली. मात्र लोकांची गर्दी पाहून हा रोड रोमियो पळून जात होता. स्थानिक तरुणांनी त्याचा पाठलाग करत त्याला पकडलं. यावेळी तरुणांनी त्याला चांगलाच चोप देत धडा शिकवला.
या तरुणांनी रोड रोमियोला मानपाडा पोलिसांना ताब्यात दिले. प्रीतम गायकवाड असे या रोड रोमियोचे नाव आहे. मानपाडा पोलिसांनी प्रीतमला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे. तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रीतम गायकवाड हा सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा आहे. तो अंधेरी मरोळ येथे राहणारा आहे. तो गुरुवारी रात्री डोंबिवलीत त्याच्या नातेवाईकांकडे आला होता.
संबंधित प्रकरणानंतर स्थानिकांकडून संताप व्यक्त केला जातोय. अशा प्रकारच्या घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत, अशा प्रतिक्रिया स्थानिकांकडून दिल्या जात आहेत. महत्त्वाचं म्हणजे कल्याण डोंबिवलीत वाढत असलेल्या गुन्हेगारीच्या घटना या खरंच डोकेदुखी आहेत. या घटनांमुळे वारंवार सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होतो. इथे महिला आणि मुली कितपत सुरक्षित आहेत? असा प्रश्न निर्माण होतो. अशाप्रकारच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं. त्यामुळे नागरिकांमधील ही भीती जाईल, असं वातावरण कल्याण डोंबिवलीत कधी बघायला मिळेल? हा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे.