500 च्या बनावट नोटा छापायचे, मुंबई पोलिसांनी सिनेस्टाईल मुस्क्या आवळल्या, सापळा रचला आणि…
मुंबईतील भायखळा पोलिसांनी बनावट 500 रुपयांच्या नोटा छापणाऱ्या आणि वितरित करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी गुप्त बातमीवरून सापळा रचून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 200 बनावट नोटा, प्रिंटिंग मशीन, लॅमीनेशन मशीन आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
सर्वसामान्य नागरिकांना कधीकधी चुकून व्यवहार करताना बनावट 500 रुपयांच्या नोटा मिळण्याच्या घटना घडतात. या नोटा बँकेत चालत नाहीत. तसेच दैनंदिन व्यवहारातही चालत नाहीत. त्या खोट्या असल्याने त्यांना महत्त्वच नसतं. त्यामुळे ज्याच्या हातात नकळतपणे ही नोट पडते त्याचं 500 रुपयांचं नुकसान होतं. विशेष म्हणजे भाजी विक्रेते, फळ विक्रेते यांना तर सहजपणे अशा माध्यमातून फसवलं जातं. गर्दीचा गैरफायदा घेऊन दुकानदारालादेखील अशा बनावट नोटा देवून फसवलं जातं. अशाप्रकारे बाजारात बनावट नोटा आणणाऱ्या आरोपींबद्दल सर्वसामान्यांच्या मनात खूप चीड आहे. पण सर्वसामान्य नागरीक काहीच करु शकत नाही. तो केवळ सहन करु शकतो आणि वाईट नशीब समजून विषय सोडून देतो. पण पोलीस याबाबत कठोर कारवाई करतात. भायखळा पोलिसांनी अशाच बनावट नोटा मार्केटमध्ये आणणाऱ्यांच्या चांगल्याच मुसक्या आवळल्या आहेत. अतिशय थरारक पद्धतीने पोलिसांनी सापळा रचून आरोपींच्या नांग्या ठेचल्या आहेत. भारतीय चलनाच्या 500 रूपये दराच्या बनावट नोटा बनवणारी टोळी आणि त्या नोटा चलनामध्ये वितरीत करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. याप्रकरणी भायखळा पोलिसांनी सापळा रचून 4 आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी कारवाई नेमकी कशी केली?
भायखळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुप्त बातमीदाराकडून भायखळा पूर्व येथे 3 इसम हे भारतीय चलनाच्या बनावट नोटा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होते. संबंधित ठिकाणी पोलिसांनी दोन पथक तयार करण्यात आले. ते घटनास्थळी दाखल झाले. काही वेळानंतर तीन संशयीत तिथे आले. त्यांना ताब्यात घेवून त्यांची तपासणी केली असता, त्यांच्या जवळ भारतीय चलनाच्या 500 रूपये किंमतीच्या 200 बनावट नोटा मिळून आल्या. ताब्यात घेतलेल्या तीन इसमांना पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता पालघर जिल्ह्यातील वाडा येथे बनावट नोटा बनवत असल्याची माहिती दिली.
पोलिसांनी वाडा येथे जाऊन आरोपी निरज वेखंडे आणि खलील अन्सारी हे बनावट नोटा तयार करत असलेचे आढळून आले. पोलिसांनी 500 रूपयांच्या बनावट नोटा बनविण्यासाठी लागणारे सर्व साहित्य मिळून आले. यात लॅपटॉप, प्रिंटिंग मशीन, लॅमीलेशन मशीन, तसेच A4 साईजचे 1367 नग बटर पेपर जप्त केले. या प्रकरणी उमरान उर्फ आसिफ उमर बलबले, यासिन युनूस शेख, भीम प्रसादसिंग बडेला आणि निरज वेखंडे यांना अटक केली. त्यांच्यावर विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशी सुरू आहे.