Mumbai Crime : शेअर ट्रेडिंग कंपनीचा डेटा चोरणाऱ्या पाच आरोपींना अटक, तिघे जण स्टॉक कंपनीचे माजी कर्मचारी
अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एकाने ओटीपी मिळविण्यासाठी इंटरनेटवरून कॉल केला होता आणि हा कॉल युनायटेड किंगडम (यूके) येथून असल्याचे दिसून आले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
मुंबई : शेअर ट्रेडिंग (Share Trading) कंपनीचा डेटा (Data) चोरणाऱ्या 5 जणांना मुंबई गुन्हे शाखेच्या सायबर शाखेने अटक (Arrest) केली आहे. अटक करण्यात आलेले तीन आरोपी हे स्टॉक ट्रेडिंग कंपनीचे माजी कर्मचारी आहेत. त्यांच्यावर स्टॉक ट्रेडिंग कंपनीचा डेटा चोरून तीन लोकांचे शेअर्स सुमारे 3.58 कोटींना विकल्याचा आरोप आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एकाने ओटीपी मिळविण्यासाठी इंटरनेटवरून कॉल केला होता आणि हा कॉल युनायटेड किंगडम (यूके) येथून असल्याचे दिसून आले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
ग्राहकांचे शेअर्स परस्पर विकले
सायबर सेलकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही डेटा चोरी मे ते 8 जून दरम्यान झाली आहे. ट्रेडिंग कंपनीच्या तक्रारीवरून पोलिसांनी जून महिन्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. आरोपींनी स्टॉक ट्रेडिंग कंपनीचे कर्मचारी असल्याचे भासवत तीन ग्राहकांना फोन करून त्यांचे ओटीपी मागितले आणि ओटीपी मिळताच त्यांनी त्या ग्राहकांच्या डिमॅट खात्यात प्रवेश घेतला. प्रवेश घेतल्यानंतर आरोपींनी ते शेअर्स विकले आणि ते विकल्यानंतर त्यांना 3.58 कोटी रुपये मिळाले जे त्यांनी दुसऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यासाठी वापरले.
दिंडोशीत गूगल पे वरुन 22 लाखाची फसवणूक
निवृत्त कर्मचाऱ्याच्या गूगल पे अकाऊंटवरुन 22 लाख रुपये फसवणूक करुन घेतल्याची घटना दिंडोशीत उघडकीस आली आहे. पीडित व्यक्ती बेस्टमधून निवृत्त झाले आहेत. निवृत्तीनंतर त्यांच्या अकाऊंटमध्ये 22 लाख रुपये बेस्ट प्रशासनाकडून जमा करण्यात आले होते. हे पैसे दोन तरुणांनी फसवणूक करुन काढून घेतले. पीडित व्यक्ती दररोज सकाळी मॉर्निंग वॉकला जातात. यावेळी त्यांची ओळख दोन तरुणांशी झाली होती. या ओळखीचा फायदा घेत या भामट्यांनी त्यांना 22 लाखाला चुना लावला. याप्रकरणी दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आळी आहे. (Five accused who stole data of share trading company arrested by cyber crime branch)