भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेत कोरोना नियमांचे उल्लंघन, कल्याण डोंबिवलीत 4 गुन्हे दाखल
केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्ह्यात जन आशीर्वाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (16 ऑगस्ट) ठाण्यातून निघालेली जन आशीर्वाद यात्रा कल्याण येथील आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यालयात संपन्न झाली.

कल्याण (ठाणे) : केंद्रीय मंत्र्यांच्या जन आशीर्वाद आयोजन प्रकरणी कल्याण डोंबिवलीत एकूण चार गुन्हे विविध पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. कल्याणच्या खडकपाडा, महात्मा फुले, कोळसेवाडी आणि डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस ठाण्यात कोरोना नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कपिल पाटील यांच्या नेतृत्वात जन आशीर्वाद यात्रा
केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्ह्यात जन आशीर्वाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (16 ऑगस्ट) ठाण्यातून निघालेली जन आशीर्वाद यात्रा कल्याण येथील आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यालयात संपन्न झाली. या यात्रेत मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी होती. इतकेच नाही तर रस्त्यावर ठिकठिकाणी स्वागताकरीता माजी नगरसेवक, अन्य पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते समर्थक उभे होते.
कल्याणच्या दुर्गाडी चौकात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी
कल्याणच्या दुर्गाडी चौकातून आज जन आशीर्वाद यात्रा सुरू झाली. टिटवाळ्यात त्याचा समारोप झाला. कल्याणच्या दुर्गाडी चौकात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती. सोमवारी जन आशीर्वाद यात्रेच्या स्वागतासाठी डोंबिवली येथील नागरी सहकारी बँकेच्या ठिकाणी भाजप कार्यकत्यांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रकरणी डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी माजी नगरसेवक मोरेश्वर भोईर, नंदूकिशोर परब, जिल्हाध्यक्ष शशीकांत कांबळे यांच्यासह 5 जणांच्या त्याचप्रमाणे कोळसेवाडी पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याण खडकपाडा पोलिसातही गुन्हा दाखल
तसेच आजही यात्रेच्या आयोजनाकरीता कल्याण खडकपाडा, महात्मा फुले चौक पोलिसांनी जिल्हा सरचिटणीस अर्जुन म्हात्रे सह सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. भादवि कलम 188 269 270, सह साथीचा रोग कायदा 1857 कलम 2,3,4, सह आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 51 ( ब ) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (135 ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.
हेही वाचा :
ठाण्याच्या कोविड रुग्णालयाने 500 कर्मचाऱ्यांना अचानक काढलं; दरेकरांचा रुग्णालय चालू न देण्याचा इशारा
शिवसेनेच्या रॅलींमधून कोरोना पसरत नाही का?; कपिल पाटलांचा राऊतांवर पलटवार