अंबरनाथमध्ये रिक्षा आणि कारचा भीषण अपघात, चार जणांचा जागीच मृत्यू
राज्यात गणेशोत्सवाचा उत्सव सुरु आहे. मात्र या उत्साहादरम्यान ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरातून एक दुखद बातमी समोर आली आहे. अंबरनाथमध्ये आज (12 सप्टेंबर) संध्याकाळी रिक्षा आणि कारचा भीषण अपघात झाला.
अंबरनाथ (ठाणे) : राज्यात गणेशोत्सवाचा उत्सव सुरु आहे. मात्र या उत्साहादरम्यान ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरातून एक दुखद बातमी समोर आली आहे. अंबरनाथमध्ये आज (12 सप्टेंबर) संध्याकाळी रिक्षा आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतक चारही जण उल्हासनगरचे असल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल
अंबरनाथच्या पालेगाव भागात संबंधित घटना घडली. या अपघातात काहीजण जखमी असल्याची देखील प्राथमिक माहिती आहे. मृतक आणि जखमी अशा सर्वांना उल्हासनगरच्या मध्यवर्ती जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी आणि रुग्णालयात दाखल झाले आहेत. अपघातग्रस्त वाहनातील नागरिक गणेश विसर्जनासाठी आल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, या माहितीला पोलिसांकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.
नालासोपाऱ्यात भरधाव डंपरने दोघांना उडवले, अपघातात तरुणांचा जागीच मृत्यू
भरधाव डंपरने उडवल्याने दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नालासोपारा पूर्वेकडील सेंट्रल पार्क येथे 6 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली होती. रोहित मिश्रा (24) आणि विनय तिवारी(25) अशी मयत तरुणांची नावे आहेत. हे दोघेही उत्तर प्रदेशातील भधोईया जिल्ह्यातील मूळचे रहिवासी आहेत. हे दोघेही नोकरीच्या शोधात मुंबईत आले होते. याप्रकरणी डंपर चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.
नोकरीच्या शोधात मयत तरुण आले होते मुंबईला
रोहित आणि विनय मुंबईहून नालासोपाऱ्यात आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आले होते. नालासोपारा पूर्व सेंट्रल पार्क रस्त्यावरुन आपल्या दुचाकीवरुन जात होते. यावेळी युटर्न घेताना त्यांच्या दुचाकीला डंपरने उडवले. या अपघातात या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी तुळिंज पोलीस ठाण्यात डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करीत चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत. कोरोनाच्या काळात नोकरी, काम धंदा नाही. शेवटी कामाच्या शोधात मुंबईला आले आणि अपघातात जीव गमावून बसल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
चंद्रपूरमध्ये मोबाईलच्या नादात शिक्षकाने जीव गमावल्याची दुर्दैवी घटना
दुसरीकडे मोबाईल हा आपल्या जीवनातील एक अविभाज्य भाग बनला आहे. मात्र, या मोबाईल वापराचे अनेक तोटे आणि दुष्परिणामही दिसून येत आहेत. 5 सप्टेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्यात मोबाईल बोलण्याच्या नादात एका शिक्षकाने आपला जीव गमावल्याची घटना मूल शहरातील पंचशील नगर भागात घडली आहे. चिरकुटा खोब्रागडे असं मृत शिक्षकाचं नाव आहे. खोब्रागडे हे रात्री कानात हेडफोन लावून मोबाईलवर चालत असताना रेल्वेचा धक्का बसल्यानं त्यांचा मृत्यू झालाय. या घटनेमुळे मूल शहरात हळहळ व्यक्त होतेय.
चिरकुटा खोब्रागडे हे रात्री जेवण झाल्यानंतर घराशेजारी असलेल्या रेल्वे रुळावर फिरायला गेले होते. कानात हेडफोन असल्यामुळे त्यांना रेल्वेचा आवाज आला नाही. गोंदियाकडून बल्लारपूरकडे जाणाऱ्या मालगाडीने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत खोब्रागडे हे दूर फेकले गेले. त्यावेळी त्यांचा जागीच मृत्यू झालाय.
हेही वाचा :
ओढ्यात आंघोळीसाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू, भाऊ थोडक्यात बचावला