26 वर्षानंतर दत्ता सामंत मर्डर केसमधून छोटा राजन निर्दोष मुक्त, पण तरीही तुरुंगातच राहणार; कारण काय?
चार अज्ञात लोक मोटारसायकलवरून आले होते. त्यांनी सामंत यांची गाडी थांबवली. त्यानंतर सामंत यांच्यावर 17 गोळ्या झाडण्यात आल्या. त्यानंतर हे आरोपी पळून गेले, असं पोलिसांनी सांगितलं.
मुंबई | 29 जुलै 2023 : प्रसिद्ध कामगार नेते डॉ. दत्ता सामंत मर्डर केसमधून अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पुराव्या अभावी छोटा राजन याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश ए. एम. पाटील यांनी छोटा राजनची सुटका केली आहे. तब्बल 26 वर्षानंतर छोटा राजनची या खटल्यातून मुक्तता झाली आहे. मात्र, तरीही छोटा राजनला तुरुंगातच राहावं लागणार आहे.
16 जानेवारी 1997 मध्ये डॉ. दत्ता सामंत हे घाटकोपरच्या पंतनगरला जात होते. त्यावेळी पद्मावती रोडवर नरेश जनरल स्टोअरजवळ त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. ही हत्या छोटा राजन गँगने केल्याचा संशय होता. त्यामुळे छोटा राजन याला अटक करण्यात आली होती. याप्रकरणाची विशेष सीबीआय न्यायालयात सुनावणी झाली. त्यावर अखेर निर्णय आला असून ठोस पुराव्याच्या अभावी छोटा राजन ऊर्फ राजेंद्र सदाशिव निकाळजे याची सुटका करण्यात आली आहे. छोटा राजननेच डॉ. सामंत यांची हत्या केली. त्यांच्या हत्येचा कट रचल्याचं सिद्ध करण्या इतपत पुरावे रेकॉर्डवर नाहीत. त्यामुळे त्याची निर्दोष मुक्तता करण्यात येत असल्याचं कोर्टाने म्हटलं आहे.
तरीही तुरुंगातच
छोटा राजन या खटल्यातून मुक्त झाला असला तरी त्याची तुरुंगातून सुटका होणार नाहीये. कारण छोटा राजनवर देशातील अनेक पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. काही प्रकरणाचे खटले कोर्टात सुरू आहेत. त्यामुळे त्याची तुरुंगातून सुटका होणार नसल्याचं सूत्रांनी सांगितलं.
छोटा राजनने हत्येचं षडयंत्र रचलं होतं, असा पक्षकाराच्या वकिलाने युक्तिवाद केला होता. मात्र, पुरावेच नसल्याने त्याची सुटका करण्यात आली. या खटल्यातील महत्त्वाचे साक्षीदार पलटले. तसेच इतरांची साक्ष आरोप सिद्ध करण्यास पुरेशी नव्हती, त्यामुळे त्याची सुटका झाल्याचं कोर्टाने म्हटलं आहे.
पोलीस काय म्हणाले?
चार अज्ञात लोक मोटारसायकलवरून आले होते. त्यांनी सामंत यांची गाडी थांबवली. त्यानंतर सामंत यांच्यावर 17 गोळ्या झाडण्यात आल्या. त्यानंतर हे आरोपी पळून गेले, असं पोलिसांनी सांगितलं. सामंत यांचे चालक भीमराव सोनकांबळे यांच्या तक्रारीवरून साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, छोटा राजनला ऑक्टोबर 2015मध्ये इंडोनेशियाच्या बाली येथून अटक करण्यात आली होती. त्यानंतर सीबीआयने त्याच्या विरोधातील सर्व खटले आपल्या हातात घेतले होते. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयच्या विशेष न्यायालयात गेलं होतं.