Kalyan Crime | मित्राने मित्रावरच का गोळी झाडली? कल्याणच्या गोळीबार प्रकरणातील महत्त्वाची माहिती उघड
कल्याणच्या हाय प्रोफाईल मानल्या जाणाऱ्या खडकपाडा परिसरात गोळीबार झाल्याची माहिती समोर आलेली. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. त्यानंतर 24 तासात याप्रकरणातील आरोपीला सापळा रचत बेड्या ठोकल्या आहेत.
सुनील जाधव, Tv9 मराठी, ठाणे | 5 ऑक्टोबर 2023 : कल्याणच्या मोहने परिसरात एका मित्रानेच मित्रावर गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आलाय. या प्रकरणी पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत आरोपीला 24 तासात बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणातील आरोपी हा पळून जाण्याचा प्रयत्नात होता. पण पोलिसांनी गुप्त बातमीदाराच्या मदतीने सापळा रचला आणि आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीकडे पिस्तूल नेमकी कशी आली? हा मत्त्वाचा प्रश्न उपस्थित झालाय. पोलीस आता या प्रकरणात नेमकी काय-काय कारवाई करतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सुशील महंतो आणि त्याचे चार ते पाच मित्र एकत्र बसले होते. यावेळी सुशील आणि उमेश यांच्यात झालेला जुन्या भांडणाचा वाद पुन्हा उफाळून आला. या रागात उमेश याने त्याच्या जवळ असलेल्या गावठी कट्ट्यातून सुशील याच्यावर गोळी झाडली. यावेळी सुशीलने हात आडवा केल्याने त्याच्या हाताचा पंजा फाडून ही गोळी त्याच्यात तोंडात गेली. त्याच्यावर उपचार सुरू असून याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी आरोपीला अटक कशी केली?
या प्रकरणी कल्याण गुन्हे शाखेला गुप्त बातमीदार मार्फत आरोपी उमेश हा रेल्वेने बाहेरगावी पळून जाणार असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहूल म्हस्के, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक संजय माळी, पोलीस हवालदार किशोर पाटील, रमाकांत पाटील, अनुप कामत, कडु, पोलीस शिपाई, गुरुनाथ जरग, विनोद चन्ने, मिथुन राथोड यांच्या पथकाने शहाड येथील रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचत आरोपीला बेड्या ठोकल्या.
या आरोपी कडून गुन्हा करताना वापरण्यात आलेलं गावठी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस तसेच मोबाईल, पॅन कार्ड असा एकूण 20 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्याने हे पिस्टल कोणाकडून आणि कशासाठी घेतलं, याचाही तपास आता कल्याण गुन्हे शाखासह खडकपाडा पोलीस करत आहेत.