मुंबईतील रिक्षा चोरांची मोड्स ऑपरेंडी उघड! रिक्षा चोरायची, नंबरप्लेट बदलायची, मग…
चोरी केलेल्या सहा ऑटो रिक्षांसह पोलिसांनी आवळल्या दोघा जणांच्या मुसक्या! वाचा सविस्तर वृत्त
मुंबई : मुंबई आणि परिसरातून ऑटो रिक्षा चोरणाऱ्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. ऑटो रिक्षा चोरी करुन ती भाड्याने चालवायला देण्याचं काम भामटे करत होते. पण त्याआधी या रिक्षाच्या नंबर प्लेटसोबत छेडछेड केली जात असल्याचं समोर आलं आहे. अखेर या रिक्षा चोरणाऱ्यांना चोरी केलेल्या रिक्षांसकट पोलिसांनी अटक केली आहे. या चोरी केलेल्या रिक्षा मालवणी ते मालाड रेल्वे स्थानकादरम्यान शेअरवर चालवल्या जात होते. हे चोर स्वतःही रिक्षा चालवण्याचं काम करायचे आणि काही रिक्षा भाड्याने चालवायला देत होते, असं तपासातून समोर आलंय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांदिवली येथून चोरीला गेलेल्या रिक्षाच्या तपासादरम्यान चोरीची रिक्षा मालवणी ते मालाड रेल्वे स्थानकादरम्यान शेअरवर नंबर प्लेट बदलून चालवली जात होती. या संबंधित माहिती कांदिवली पोलिसांच्या शोध पथकाला मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरलवली.
रिक्षा चोरीप्रकरणी कांदिवली पोलिसांनी इद्रीश मुस्ताक अन्सारी आणि इक्बाल मोहम्मद रफिक शेख या दोघा चोरट्यांना बेड्या ठोकल्यात आहेत. त्यांची आता कसून चौकशी केली जातेय.
पोलिसांच्या चौकशीत दोन्ही चोरट्यांनी आपली मोड्स ऑपरेंडी काय होती, हेही सांगितलंय. दोघे जण रिक्षा चोरून त्यांचे नंबर बदलायचे आणि त्या रिक्षा रिक्षाचालकांना शेअर रिक्षा चालवण्यासाठी देत असत. पोलिसांच्या तपासात काही चोरीच्या ऑटो रिक्षांच्या नंबर प्लेट बदलून विकण्याचे कामही केले असल्याचेही समोर आले आहे.
सध्या कांदिवली पोलिसांनी एका रिक्षाची चौकशी करत चोरीच्या सहा रिक्षा जप्त केल्या आहेत. येत्या काळात आणखी काही रिक्षा देखील जप्त केल्या जाण्याची शक्यता आहे.
कांदिवलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हेमंत गीते, पोलीस उपनिरीक्षक इंद्रजित भिसे, सत्यवान जगदाळे, श्रीकांत तावडे, रवी राऊत, सुवान केसरकर, योगेश हिरेमठ, दादासाहेब घोडके, संदीप म्हात्रे यांनी अथक परिश्रमानंतर ही रिक्षा चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय.